पुणे :मार्केट यार्डातील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात गोळीबार करून २७ लाख ४५ हजारांची रोकड लुटून पसार झालेल्या सात जणांच्या टाेळीस खंडणीविरोधी पथकाने अटक केली. गुन्ह्यातील तिघे जण कारागृहात असतानाच, झालेल्या ओळखीनंतर मार्केटयार्डातील कुरिअर कंपनीवर दराेडा टाकण्याचा कट रचला. कारागृहाबाहेर आल्यानंतर रेकी करीत त्यांनी गुन्हा केल्याचे पाेलिस तपासात उघडकीस आले. आराेपींकडून ११ लाख १८ हजारांची रोख रक्कम, सात माेबाइल, तीन दुचाकी, कोयता असा १३ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अविनाश उर्फ सनी रामप्रताप गुप्ता (वय २०, रा.मंगळवार पेठ), आदित्य अशोक मारणे (वय २८, रा.रामनगर, वारजे), दीपक ओमप्रकाश शर्मा (वय १९, रा.राहुलनगर, शिवणे), विशाल सतीश कसबे (वय २०, रा.मंगळवार पेठ), अजय बापू दिवटे (वय २३, रा.रामनगर, वारजे), गुरुजनसिंह सेवासिंह वीरक (वय २०, रा.शिवाजीनगर), नीलेश बाळू गोठे (वय २०, रा.मंगळवार पेठ) यांना अटक केली. त्यांच्या फरार चार साथीदारांचाही पाेलिस शाेध घेत आहेत.
मार्केटयार्डातील भुसार बाजार परिसरात पी.एम. कुरिअर कंपनीच्या कार्यालयात शनिवारी (दि. १२) भर दुपारी पाच आराेपी घुसले. त्यांनी कुरिअर कंपनीतील कर्मचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखविला. कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केल्यानंतर आराेपींनी पिस्तुलातून गोळीबार करून २७ लाख ४५ हजारांची रोकड लुटून पसार झाले हाेते. गुन्हे शाखेच्या पाच पथकांकडून आराेपींचा शाेध सुरू हाेता. सीसीटीव्ही पडताळल्यानंतर सराईत गुन्हेगार अविनाश गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी दराेडा टाकल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर, सापळा रचून गुप्तासह साथीदारांना पकडले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे आदी यावेळी उपस्थित होते.
सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक विकास जाधव, यशवंत ओंबासे, मयूर तुपसौंदर, सयाजी चव्हाण, प्रमोद सोनवणे, संजय भापकर, हेमा ढेबे, नितीन कांबळे आदींनी ही कारवाई केली.
कारागृहात झाली हाेती ओळख
आराेपी गुप्ता फरार असलेला आराेपी ओंकार आल्हाट आणि साेनू खुडे यांची कारागृहात ओळख झाली होती. मार्केटयार्डातील पी.एम. कुरिअर कंपनीच्या कार्यालयात मोठी रक्कम असते. याबाबत गुप्ता आणि मारणे यांना माहिती हाेती. मारणे हा डिसेंबर, २०२१ आणि गुप्ता हा या वर्षी जानेवारी महिन्यांत कारागृहाबाहेर आला. मागील तीन ते चार महिन्यांपासून ते रेकी करून दराेडा घालण्याचा प्रयत्न करीत हाेते. या गुन्ह्यांतील इतर आराेपींना पैशांचे आमिष दाखवून टाेळीत सहभागी करून घेत दराेडा टाकला.
असा काढला आराेपीचा माग
गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रफीत पडताळून पाहिल्या. त्यावरून आराेपींच्या दुचाक्या काेठून आल्या आणि रक्कम लुटून ते काेणत्या दिशेला गेले, याचा शाेध घेतला. सर्वप्रथम त्यांनी मंगळवार पेठेतील एका प्रकल्पावर कपडे बदलले. तेथून शाहीर अमर शेख चाैक, पुणे विद्यापीठ चाैकातून बाह्यवळण महामार्गावर आले. पवना धरणकाठावर गुन्ह्यातील सर्व आराेपी एकत्रित जमले आणि पार्टी केली. पाेलिसांनी तपास करीत ते मावळातील माेर्वेगावातील हाॅटेलवर आल्यानंतर सापळा रचून ताब्यात घेतले.
कपडे, दारू, जेवणावर पैसे खर्च
आराेपींनी लुटलेल्या रकमेतून २४ हजार रुपयांचे कपडे विकत घेतले. त्यानंतर, पवना काठावरील टेंट हाउसमध्ये मुक्काम करीत पार्टी केली. लुटलेल्या रकमेतील काही रक्कम दारू आणि जेवणावर खर्च केली.