बारामती : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदाची ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत २५ हजार २७१ जागा भरण्यात येणार आहे. यासाठीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर १७ जुलै पासून सुरु झाले आहे. ते ३१ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे.
या परीक्षेसाठीचे परीक्षा शुल्क १०० रुपये आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक व महिला यांना परीक्षा शुल्क माफ आहे. या परीक्षेमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ७५४५ , केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सीआयएसएफ ८४६४, सशस्त्र सीमा बल म्हणजेच एसएसबी ३८०६, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीबीपी १४३१, आसाम रायफल्स ३७८५, सेक्रेटेरियट सेक्युरिटी फोर्स म्हणजेच एसएसएफ २४० जागा अशा एकूण २५ हजार २७१ जागा भरल्या जाणार आहेत.
यामध्ये पुरुषांच्या २२ हजार ४२४ तर महिलांच्या २८४७ जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवगार्साठी १८ ते २३ वर्षे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी १८ ते २८ वर्षे याशिवाय इतर मागास प्रवगार्साठी (ओबीसी) १८ ते २६ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. उंचीची पात्रता पुरुषांसाठी १७० सेंटिमीटर तर महिलांसाठी १५७ सेंटीमीटर इतकी आहे. अनुसूचित जमातीमधील उमेदवारांना उंचीमध्ये सवलत देण्यात आली आहे. यामध्ये पुरुषांची उंची १६२.५ सेंटीमीटर तर महिलांचे उंची १५० सेंटिमीटर इतकी आवश्यक आहे. पुरूषांच्या छातीचे मोजमाप घेतले जाते. यामध्ये छाती न फुगवता ८० सेमी. व ५ सेमी. छाती फुगवता येणे आवश्यक आहे. तसेच उंची आणि वयाच्या प्रमाणात उमेदवाराचे वजन असणे आवश्यक आहे.
या पदांसाठीची लेखी परीक्षा १०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून त्यासाठी ९० मि. इतका वेळ निर्धारित करण्यात आलेला आहे. ही लेखी परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. यामध्ये सामान्य बद्धिमत्ता चाचणी व तर्कशक्ती, सामान्य ज्ञान, गणित व हिंदी किंवा इंग्रजी व्याकरण या ४ विषयांचा समावेश आहे. लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. या शारिरीक क्षमता चाचणीत पुरुष उमेदवारांना ५ किमी. अंतर २४ मिनिटांत पूर्ण करणे आवश्यक आहे. तर महिला उमेदवारांना १.६ किमी. (१६०० मी.) अंतर ८ मिनिट ३० सेकंदामध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे.