पुणे : काँग्रेसने जातीयवाद व सांप्रदायिकत्वाचे विष कालवले आहे. मागच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला की संविधान बदलणार आहे. पण, संविधान कोणी बदलू शकत नाही. कोणाची इच्छा असली तरी ते बदलता येणार नाही. आम्ही ते बदलू देणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत गडकरी बोलत होते.
गडकरी म्हणाले, चुकीची अर्थव्यवस्था आणि भ्रष्ट्राचारामुळे देशाचा सत्यानाश झाला आहे. काँग्रेसला अनेक गाेष्टी करता आल्या नाहीत. देशाचा विकास करण्यासाठी केवळ पैशाची गरज नाही, तर इमानदारी, योग्य नीती आणि नेतृत्व हवे. राज्यातील जनतेच्या भविष्याचा विचार करणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचा विजय झाल्यास आपल्या राज्याच्या विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट वेगाने धावणार, असा विश्वास केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ५४ हजार कोटींची कामे मंजूर केली आहेत. आगामी काळात ५० हजार कोटींची कामे करून सुमारे १ लाख कोटींची कामे पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
देश विश्वगुरू झाला पाहिजे
काँग्रेस काळात विविध कलमी घोषणा झाल्या, मात्र विकास कधीच झाला नाही. गरिबी हटावचा नारा दिला, पण गरिबी हटली नाही. राज्यात सरकारी पैशातून विविध विकासकाम करणे शक्य नव्हते. मी मंत्री असताना बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या उपक्रमातून विविध रस्त्याची कामे केली. देशात मोदी सरकारने नवीन आर्थिक धोरणं अवलंबत विकासाला गती दिली. आपली आटोमोबाईल इंडस्ट्री वेगाने विस्तारत असून, हिंदुस्थानचे महत्त्व जगात वाढत आहे. त्यासाठी भाजप काम करीत असून, हा देश विश्वगुरू झाला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ५४ हजार कोटींची कामे मंजूर
पुणे आणि पिंपरी चिंचवड विकासाठी केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयाने तब्बल ५४ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहे. त्यानुसार रस्ते, बोगदे, विविध विकासकामे वेगाने वाढत आहेत. आता मुंबई-पुणे महामार्गावर ट्रॅफिक जाम असते. अटल सेतूपासून काही अंतरावर नवीन मुंबई ते पुणे महामार्ग बांधत आहे. तो रिंगरोडला जोडला जाईल. या महामार्गासाठी ५५ हजार कोटींचा खर्च आहे. त्यामुळे मुंबई ते बंगलोर सहा तासांत अंतर कापले जाणार आहे, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
सामाजिक समतेला प्राधान्य
भाजपचे कधीही जातीपातीचे काम केले नाही. सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे, हे आमचे उद्दिष्ट आहे. आपण सर्वांनी एक झाले पाहिजे. संस्कृती आपली एकच असून, ती जगविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले.
पुण्यातील प्रदूषणाबाबत चिंता वाटते
पुण्यात महर्षीनगरला माझी बहीण राहत होती. पर्वतीची हवा शुद्ध होती. पण, आता प्रदूषण वाढले असून, त्यांची चिंता वाटते. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
व्यक्ती विकास, पायाभूत सुविधांकडे लक्ष
कोरोना कालावधीत मी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. राज्य सरकारमध्ये काम करताना कोल्हापूर अमरावती, कोथरूड अशा विविध ठिकाणी विकासकामे केली आहेत. विशेषतः कोथरूडमध्ये विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष केले नाही. आगामी पाच वर्षांत पायाभूत सुविधा आणि व्यक्ती विकासाकडे लक्ष देणार आहे, असे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.