सासवड : सध्या देशात समता आणि स्वातंत्र्य आहे; परंतु बंधुत्व आहे का, हे तपासावे लागेल. कारण बंधुत्व असेल तर लोक एकमेकांना गोळ्या घालणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार धर्मापुरते मर्यादित नाहीत. त्यांनी लिहिलेले संविधान हे संपूर्ण देशातील सर्व जाती-धर्मांतील जनतेसाठी आहे. त्याला कोणतेही कुंकू नाही. संविधानाचे खरे मारेकरी अशा साहित्य संमेलनांमधून शोधावे लागतील, असे परखड मत आपल्या अध्यक्षीय भाषणातून ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.सूर्य मावळला, की काजव्यांचे राज्य सुरू होते आणि आपण कृत्रिम प्रकाशात राहतो. त्यामुळे आपण सूर्यप्रकाशाकडे जायचे की कृत्रिम प्रकाशात राहायचे, हे ठरविले पाहिजे. अलीकडच्या काळात सांस्कृतिक आणि जातीय वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वांचे अवमूल्यन होत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.सासवड (ता. पुरंदर) येथे सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष पंकज धिवार यांनी प्रास्ताविक केले. या वेळी राज्यमंत्री विजय शिवतारे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य प्रकाश पवार, सासवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर दिगंबर दुगार्डे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष पंकज धिवार, कामगार नेते ज्ञानदेव घोणे, गटविकास अधिकारी संतोष हराळे, भीमराव कांबळे, राजेश चव्हाण, संदीप बनसोडे, दादासाहेब गायकवाड, रवींद्र वाघमारे, स्वप्निल घोडके आदी उपस्थित होते.दुपारच्या सत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘बौद्धेतरांशिवायचे कार्य’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. रमेश जाधव, डॉ. संभाजी मलघे, ज्येष्ठ साहित्यिक अन्वर राजन यांनी सहभाग घेतला. प्रसिद्ध प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांच्या ‘मी वादळवारा’ या संगीतमय कार्यक्रमाने संमेलनाची सांगता झाली.सासवड येथे झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार साहित्य संमेलनाच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव सन्मान’ या वेळी भोर येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ यांना (डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट समाजसेवा सन्मान), ज्येष्ठ उद्योजक नामदेवआबा जगताप यांना (डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट व्यावसायिक सेवा सन्मान).पत्रकार गणेश मुळीक यांना या वर्षापासून दिला जाणारा पहिला (डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता) सन्मान मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला गेला.
संविधान हे सर्व जाती-धर्मांतील जनतेसाठी- श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 1:49 AM