पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा कायदा याच अधिवेशनात करण्यात येणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांनी रविवारी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. शहर भाजप, बांधकाम कामगार सेना आणि जिजाई प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दानवे यांच्या हस्ते नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जटिल बनला आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी कायदा करावा लागणार आहे. हा कायदा याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे पर्याय सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या सीताराम कुंटे समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. त्याचा आधारघेऊन आणि सर्व कायदेशीर बाबी तपासून पाहण्याचे काम सुरू आहे. अनधिकृत बांधकामांबाबत याच अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.या वेळी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, भाजपाचे संघटन महामंत्री रमेश भुसारी, शहराध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपाचे नेते सारंग कामतेकर, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, सरचिटणीस राजू दुर्गे, जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका सीमा सावळे, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
अधिवेशनात बांधकामे नियमित
By admin | Published: March 30, 2015 5:33 AM