पुणे : समाजाला दिशा देण्याचे काम करणारे अनेक कार्यकर्ते गणेशोत्सवातून घडतात. मात्र, आजचे उत्सवाचे स्वरुप बदलत चालले आहे. बदलत्या स्वरुपाला आपण जबाबदार आहोत. केवळ उत्सवातील १० दिवसांपुरते नाही, तर वर्षभर आपण समाजासाठी खूप काही करु शकतो. त्यासोबतच देखाव्यांतून ऐतिहासिक गोष्टींना तंत्रज्ञानाची जोड देऊन चांगला संदेश देणे देखील शक्य आहे. केवळ स्पिकर्सच्या भिंती आणि थयथयाटापेक्षा पुढील ५० वर्षे पुरतील असे विचार आजच्या पिढीला आपण द्यायला हवेत, असे मत दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी व्यक्त केले. शनिपार मंडळ ट्रस्टतर्फे भक्ती गणेशाची सेवा मानवाची असे कार्य केलेल्या गडचिरोली नक्षलग्रस्त भागात केलेले सामाजिक कार्य व गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमधील नोंदीबद्दल उदय जगताप यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. कुमठेकर रस्त्यावरील सेवासदन हायस्कूल मुलींची शाळा येथे झालेल्या कार्यक्रमाला संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद पंडित, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, गोपाळ तिवारी, मंडळाचे शेखर साळुंके, प्रसाद पळसकर, गणेश घोले, संयोजक गणेश शेडगे, गोरख पळसकर यांसह कृष्णा जाधव, संदीप पाषणकर, तुषार जोरी, योगेश फाळके आदी उपस्थित होते. डॉ. देखणे म्हणाले, कार्यकर्ता घडवणारे एकमेव विद्यापीठ गणेशोत्सवाच्या रुपाने उभारले आहे. यासाठी सामाजिक जाणीवही पात्रता असून सच्चा कार्यकर्ता ही मिळणारी पदवी आहे. प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये समाजात सक्रिय व सकारात्मक बदल घडवण्याची ताकद आहे. विकृतीवर प्रकृतीची आणि त्यावर संस्कृतीची मात करण्याचे काम कार्यकर्ते करतात. त्यामुळे गणेशोत्सव नसता तर कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली नसती.प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, सनदशीर मार्गाने गोष्टी मिळाल्या, तर नक्षलवाद किंवा गुन्हेगारी निर्माण होणार नाही. बुलेट नको, बुक हवेही संकल्पना अशा भागांमध्ये राबवायला हवी.उदय जगताप म्हणाले, हात उगारण्यासाठी नाही तर उभारण्यासाठी आहेत, हे ब्रीद अंगीकारुन धनकवडीतील आदर्श मित्र मंडळामार्फत आम्ही काम केले. मंडळ आपल्या खिशातील पैशाने चालवू ही संकल्पना आणून कार्यकर्त्यांना रोजगार देखील उपलब्ध करुन देण्याकरीता पुढाकार घेतला. गडचिरोलीमध्ये देखील चांगले कार्य करणा-या पोलिसांना मदतीसाठी आम्ही गेलो. गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो, ती ओळख पुसण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहेत. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.
विधायक विचार पुढील पिढीला द्यायला हवे : रवींद्र सेनगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 6:23 PM