बारामती: बारामती एमआयडीसीतील रिलायन्स रीटेल ली मॉलमध्ये ‘एमआरपी’ पेक्षा जादा किंमती लावल्याप्रकरणी वैधमापन शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. वैध मापन शास्त्र अधिनियम २००९ च्या कलम १८ (१) सह नियम ६ (३),१८ (१) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम ३६ अन्वये ही नोटीस बजावण्यात आल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
सोनवडी सुपे (ता.बारामती) येथील ग्राहकाने रिलायन्स मार्ट येथे काही वस्तु खरेदी केल्या. यामध्ये त्या ग्राहकाने सर्फ एक्सेलचे ३ किलोचे पाकिट देखील खरेदी केले.त्यावर एमआरपी ३०० रुपये असताना त्यांच्याकडुन ३४५.६० रुपये घेण्यात आले. ग्राहकाकडुन ४५.६० पैसे जादा घेतले. संबंधित ग्राहकाने तेथील कर्मचाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आणला. मात्र, आमच्या संगणकावर ही रक्कम आहे. तेवढेच पैसे द्यावे लागतील,असे सांगण्यात आले.यावेळी येथे मॅनेजरने एमआरपी पेक्षा जादा घेतलेली रक्कम परत करण्यास नकार दिल्याचे सुहास वाबळे या ग्राहकाने दिलेल्या तक्रारीमध्ये नमुद करण्यात आले आहे.याबाबत वाबळे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे तुषार झेंडे पाटील व दिलावर तांबोळी यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
त्यावरुन वैधमापन शास्त्र निरीक्षक राजेंद्र टाळकुटे यांच्यासमवेत झेंडे पाटील, तांबोळी यांच्यासह रिलायन्स ला भेट दिली.यावेळी वैधमापन शास्त्र निरीक्षक टाळकुटे यांनी संबंधित ठिकाणी तपासणी केली. त्याच्या व्यतिरिक्त गव्हाच्या पाच किलो पिशवीवर एमआरपीवर स्टीकर लावल्याचे देखील निदर्शनास आले. एमआरपीची शंका असणारा माल जप्त करण्यात आला आहे. त्याबाबतचा मेमो रिलायन्स मार्टच्या व्यवस्थापकास देण्यात आला आहे.
याबाबत ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, किंमतीचे स्टिकर लावण्याचा अधिकार केवळ उत्पादकाला आहे. कोणत्याही वस्तूचे एक्सपाईलडेट, एमआरपी खडाखोड करणे, त्यावर स्टिकर चिकटविणे वैध मापन शास्त्रानुसार दंडनीय गु्न्हा आहे.यामध्ये ऐपतीप्रमाणे दंड होतो.दंड न भरल्यास खटला चालविला जातो. ग्राहकांनी याबाबत जागृत राहणे गरजेचे आहे, असे प्रकार कोठे आढळल्यास संबंधित दुकानाच्या बिलाचा फोटो काढून तो वैधमापनशास्त्र यंत्रणेच्या राज्य मुख्यालयाकडे पाठवावा. व्हॉट्सअप नंबर ९८६९६९१६६६ हा त्यासाठी क्रमांक असून यावर तक्रार पाठवावी, असे आवाहन अॅड. झेंडे यांनी केले आहे.