पुणे : ग्राहकाला खराब मोबाईल पुरविणा-या ईबेला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. तक्रारदाराला नवीन मोबाईल आणि 45 दिवसांत 3 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मंचाने दिला आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष अनिल खडसे, सदस्य क्षितिजा कुलकर्णी आणि संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी प्रकाश दत्तात्रेय सपकाळ (रा. सदाशिव पेठ) यांनी ई-बेच्या मुंबई आणि सिकंदराबादमधील कार्यालयातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. सपकाळ यांनी 2 जून 2017 ई-बे या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून 8 हजार 499 रुपये किमतीचा लिनोव्हो कंपनीचा फोन खरेदी केला होता. 7 जून रोजी त्यांनी दिलेल्या पत्यावर संबंधित मोबाईल पाठविण्यात आला. सपकाळ यांनी पार्सल खोलून पाहिले असता मोबाईल खराब असल्याचे लक्षात आहे. मोबाईलच्या एका बाजूची स्क्रीन फुटलेली होती. त्यामुळे त्यांनी दुस-या दिवशी ई-बेच्या हेल्पलाईनवर फोन करून तसेच कंपनीला मेल करून याबाबत माहिती दिली. कंपनीच्या प्रतिनिधीने मागणी केल्यानुसार त्यांनी मोबाईलचे फोटो देखील पाठवले व मोबाईल बदली करून देण्याची मागणी केली. नुकसान भरपाई म्हणून 50 हजार रुपये आणि तक्रार व नोटिसचा खर्च आणि मानसिक त्रासाबद्दल 10 हजार रुपये मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने मंचाकडे दाखल केलेल्या दाव्यात केली होती.
खराब मोबाईल पुरविणा-या कंपनीला ग्राहक मंचाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 1:37 PM