भाऊसाहेब रुपनवर: कळंब येथे शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्राचे उद्घाटन
वालचंदनगर :
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पिकवलेला माल थेट ग्राहकाला देऊन शेतकरी व ग्राहक हे लाभार्थी बनवण्यासाठी ‘पिकेल ते विकेल’ या योजनेचा सर्वसामान्य ग्राहकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन इंदापूर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी केले.
कळंब येथील जानकरवस्ती येथे थेट शेतकरी ते ग्राहक विक्री सुरू करण्यात आली. या वेळी तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनर यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बाेलत होते. या वेळी कृषी सहायक एस. जी. कांबळे, भानुदास जानकर ,सोमनाथ पांढरमिसे, युवराज जानकर, उत्तम जानकर, महेश धायगुडे, किरण जानकर, हरिभाऊ देवकर, सोमनाथ जानकर, रोहित जानकर, संदीप जानकर, आप्पासाहेब जानकर, बलभीम धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी नितीन जानकर यांनी सेंद्रिय पद्धतीने ३० गुंठे क्षेत्रात बटाट्याचे उत्पादन घेतले. त्यासाठी त्यांना ४० हजार रुपये खर्च आला, तीन महिन्यांच्या उत्पादनानंतर साधारणपणे दहा टन बटाटा उत्पन्न उत्पादन निघेल व सध्याच्या प्रति किलो १५ रुपये दराप्रमाणे बटाटा विक्री केली, तर दीड लाख रुपये उत्पन्न मिळेल, तीन महिन्यांत खर्च वजा जाता एक लाखापेक्षा जास्त उत्पादन मला मिळेल असा विश्वास शेतकरी नितीन जानकर यांनी व्यक्त केला. त्यांनी शेतामध्ये आलेल्या ग्राहकांना थेट पंधरा रुपये किलोने बटाटा विक्री केली या बटाट्यापासून वेफर्स तयार होतात व खाण्यासाठीही उपयुक्त असल्याने ग्राहकांना दुहेरी फायदा होणार आहे.
बाजारात मागणी असलेल्या पिकांच्या लागवडीवर भर देऊन शेतमाल विक्रीसाठी ब्रँड विकसित करून उत्पादन ते ग्राहक यामधील इतर व्यवस्थेला फाटा देऊन शेतकऱ्यांनी पिकवलेला माल संत सावता माळी रयत बाजाराच्या माध्यमातून थेट शेतकरी ते ग्राहक असा उपक्रम नितीन दत्तात्रय जानकर यांनी सुरू केला आहे.