पौड : मुळशी तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या पौड येथे युनियन बँक आॅफ इंडिया या केवळ एकाच राष्ट्रीयीकृत बँकेची एकमेव शाखा आहे. त्यातही अपुरे मनुष्यबळ व अपुऱ्या सोयीसुविधा असल्याने बँक व्यवहारांसाठी येणाºया ग्राहकांना तासन्तास ताटकळत बसावे लागते.पौड हे मुळशी तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असल्याने या ठिकाणी सर्व प्रशासकीय कार्यालये आहेत. तहसील कार्यालय, जमीन खरेदी-विक्री केंद्र आदी अन्य महत्त्वाची शासकीय कार्यालयेही आहेत. तसेच, पौड हे तालुक्यातील अनेक गावांसाठी आठवडेबाजाराचे ठिकाण असल्याने त्या ठिकाणी तालुक्यातील नागरिकांचे बहुतांश आर्थिक व्यवहार होत असतात. मात्र, या सर्व व्यवहारांसाठी युनियन बँक आॅफ इंडिया या बँकेची एकच शाखा आहे. शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, बचत गट व अन्य सामान्य नागरिकांची हजारो खाती या एकाच राष्ट्रीयीकृत बँकेत आहेत. बँकेची जागाही अपुरी असून अनेक वर्षांपासून या ठिकाणी अपुरे मनुष्यबळ असल्याने नेहमी ग्राहकांची भलीमोठी रांग तासन् तास आर्थिक व्यवहारांसाठी ताटकळत उभी असलेली दिसते.एटीएम सेंटरमध्येही पैशाची नेहमीच चणचण असते. कधी मशिन चालू, तर कधी बंद असते. एटीएम सेंटरचे छत कधी पडेल, सांगता येत नाही. तेथे कायम अस्वच्छता असते. ग्राहक सेवा केंद्राचा फोनही तांत्रिक अडचणीचे कारण सांगून बंद केला जातो.व्यापाºयांकडून आंदोलनाचा इशाराव्यापारी वर्ग या सर्व गैरसोयींमुळे सर्वाधिक त्रस्त आहे. तत्काळ यासंबंधात काही उपाययोजना केल्या नाहीत, तर पौड गाव व्यापारी संघाच्या वतीने बँकेसमोर ‘भजन करो आंदोलन’ करण्याचा इशारा पौड गाव व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कार्ले, उपाध्यक्ष दीपक सोनवणे, सचिव चंदू दादा केनी, खजिनदार दत्तात्रय लांडगे, संस्थापक-अध्यक्ष सनी ऊर्फ विशाल जनार्दन राऊत यांनी दिला आहे.
पौडमध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या केवळ एकाच शाखेमुळे ग्राहकांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 3:09 AM