नसरापूर : पुणे जिल्ह्यातील सुवासिक तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या नसरापूर (ता. भोर) येथील या हंगामातील तांदूळ विक्रीची सुरुवात काटा पूजनाने झाली. सुवासिक तांदूळ बाजारात हंगामाची आवकच १०० क्विंटलपेक्षा अधिकने झाली.
प्रामुख्याने नसरापूर येथील तांदूळ बाजारात इतर वाणाच्या तांदळापेक्षा इंद्रायणी जातीच्या सुवासिक तांदळाच्या वाणास मोठी मागणी आहे.
आज भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नसरापूर येथील उपबाजारच्या आवारात या वर्षीच्या हंगामातील तांदूळ विक्रीची सुरुवात काटा पूजनाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुश खंडागळे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली. त्यावेळी उपसभापती संपतराव अंबवले, संदीप चक्के, राज तनपुरे, मिलिंद आवाळे, लक्ष्मण पारठे, लक्ष्मण काळे, सोमनाथ निगडे व संस्थेचे सचिव चंद्रकांत तांदळे, चंद्रकांत साळेकर आणि पांडुरंग आंबवले आदी मान्यवर व अनिल भिलारे, सुनील खुटवड शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, कराड, सांगली आदी भागांतून प्रामुख्याने येथील सुवासिक तांदळाला मोठी मागणी आहे. या तांदूळ बाजारात भोर तालुक्यातील हातवे, तांभाड, जांभळी, सोंडे, मोहरी, दीडघर तर वेल्हा तालुक्यातून वांगणी खोऱ्यातील कोळवडी, मांगदरी, कातवडी, वांगणी, करंजावणे, मार्गासनी, वाजेघर, दामगुडास्नी व वेल्हा आदी गावांतील तांदूळ ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. येथील बाजारात व्यापारी आणि ग्राहक तांदूळ खरेदीसाठी बाजारात आल्याने चोखंदळपणे प्रतीनुसार तांदळाची खरेदी करतात व तांदळाच्या प्रतीनुसारच भाव त्यांच्याकडून दिला जातो.
या वर्षीच्या चालू हंगामात इंद्रायणी तांदळास ४५ ते ५५ तर रत्नागिरी तांदळास ३२ ते ३५ पर्यंत भाव मिळत आहे. या दोन्ही तांदळाबरोबर साधारणपणे इंद्रायणीसारखा दिसणारा इंडम वाणाचा तांदूळही बाजारात येऊ लागला आहे.
जानेवारीपासूनच या भागात यात्रेचा हंगाम सुरू होतो. या यात्रांच्या खर्च पाण्यासाठी या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात तांदळाची नसरापूर येथील हक्काच्या बाजारपेठेत विक्रीस आणतात. त्यामुळे या यात्रांच्या हंगामातच तांदळाची विक्री मोठ्या प्रमाणात होते. शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीस आणलेला तांदळाची विक्री करून तांदूळ शिल्लक राहील्यास उर्वरित तांदळाची पोती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन संकुलात मोफत ठेवण्याची सोय केली असल्याचे सभापती अंकुश खंडागळे यांनी सांगितले.
नसरापूर येथील तांदूळ बाजारात यापूर्वी आंबेमोहर, रत्नागिरी २४, वरंगळ, चकांदळ आदी जातीच्या तांदळाला विशेष मागणी होती. त्यातही सुवासिक आंबेमोहर तांदळाला विशेष पसंती मिळत असे. मात्र, काळाच्या ओघात सुवासिक आंबेमोहोर तांदळाची जागा आता सुवासिक इंद्रायणी तांदळाने घेतली आहे.
भोर व वेल्हे तालुक्यातील यात्रांचा हंगाम सुरू झाला असल्याने, येथील शेतकरी तांदूळ त्वरित विक्रीस आणत आहेत. भोर व वेल्हा तालुक्याच्या मध्यवर्ती असलेली नसरापूर तांदूळ बाजारपॆठ सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे बाजारात नेहमी तांदूळ खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.
रविवार आठवडे बाजारात हंगामातील तांदूळ विक्रीची सुरुवात भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नसरापूर येथील उपबाजारच्या आवारात काटा पूजनाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुश खंडागळे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली.
छाया _ अथर्व भुतकर, नसरापूर