लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरापेक्षा आता ग्रामीणमध्ये कोरोनाबाधित दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बाधित सापडल्यानंतर त्या बाधित क्षेत्रात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे आवश्यक आहे. परंतु, जिल्ह्यात आंबेगाव, दौंड, हवेली, जुन्नर आणि शिरूर या पाच तालुक्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा वेग मंदावला आहे. येथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण प्रत्येकी १० टक्के असून, या तालुक्यांना अधिक काम करण्याची गरज असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोना आढावासंदर्भात त्यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पानसरे म्हणाल्या, एकूण जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण १२.५ टक्के एवढे आहे. इंदापूर, खेड, पुरंदर, वेल्हा, मावळ, मुळशी या तालुक्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम चांगले झाले आहे. आशा स्वयंसेविकांकडून सर्वेक्षणाची सातवी फेरी सुरू आहे. त्यामध्ये ६ हजार ५ बाधित सापडल्यामुळे पुढील संसर्ग साखळी तोडण्यास मदत झाली. याशिवाय जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी सीएसआरच्या माध्यमातून ५३ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मिळाले आहेत. तर जिल्हा नियोजन समितीकडून दहा प्रस्तावित आहेत.