धायरी : मुंबई - बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरातील सेल्फी पॉइंट येथे गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट सेवा रस्त्यावर गेला. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंटेनर चालक मात्र जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. दरम्यान कंटेनर महामार्गावरून खाली सेवा रस्त्यावर आला. व पुढे सेवा रस्त्यालगत असणाऱ्या रॉयल रेस्टो बारच्या पायऱ्यांना धडकला. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंटेनर चालक मात्र जखमी झाला आहे.
आठ दिवसांत चार अपघात; स्थानिक ग्रामस्थ संतप्त
नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. मागील गुरुवारी सेल्फी पॉइंटजवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान शुक्रवारी रात्री पुन्हा त्याच ठिकाणी मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले. त्यानंतर शनिवारी सकाळी साडेबाराच्या सुमारास नवले पुल परिसरात अपघात झाला. तर आज गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पुन्हा अपघात झाल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे प्रकल्प संचालक सुहास चिटनीस आल्याशिवाय अपघात ग्रस्त वाहने हलवू देणार नाही, असा पवित्रा उपसरपंच सागर भूमकर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घेतला. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करीत ग्रामस्थांची समजूत काढली. नवले पुल परिसरातून जाताना स्थानिकांना भीती वाटत आहे.