पुणे : शहरातील सर्वात मोठ्या असलेल्या आंबील ओढ्यालगतच्या झोपड्या पालिका प्रशासनाने हलविण्यास सुरुवात केली आहे. यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. या ठिकाणी ओढा अर्धवर्तुळाकार झाला असून त्याची लांबी अंदाजे २९५ मीटर आहे. सध्या अस्तित्वातील नाल्याचा प्रवाह अर्धवर्तुळाकार फिरून पुढे जात असल्याने पाण्याचा फुगवटा तयार होऊन पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नगररचना आणि विकास आराखड्यातील नकाशानुसार प्रवाह सरळ केल्यास पाण्याचा निचरा सुरळीत होऊन पुराचा धोका टळणार असल्याचा पालिकेचा निष्कर्ष आहे.
शहरात मागील दोन वर्षांपासून अचानकपणे ढगफुटीसारखा पाऊस पडून आंबिल ओढ्याला पूर येत आहे. ओढ्यालगत राहणाऱ्या काही नागरिकांना जीवही गमवावे लागले आहेत, तर अनेकांचे संसार अद्यापही सावरलेले नाहीत. पाण्याचा फुगवठा जास्त प्रमाणात होत असलेल्या भागातील प्रवाह सरळ करण्याबाबतच्या ठरावाला पालिका आयुक्तांनी मागील वर्षी मान्यता दिलेली आहे.
नगररचनेच्या नकाशानुसार ओढ्याचा प्रवाह सरळ दर्शविलेला असून, त्याची रुंदी अंदाजे ५० फूट व अंदाजे लांबी १५० मीटर दर्शविण्यात आलेली आहे. सन १९८७ व सन २०१७ च्या मान्य विकास आराखड्यामध्येसुद्धा मान्य टीपी नकाशानुसार आंबिल ओढा नाला दर्शविण्यात आलेला आहे. तसेच त्यावर २४ मीटरचा एचसीएमटीआर रस्ता दर्शविण्यात आलेला आहे.
शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी मागील १०० वर्षांतील अधिकतम पर्जन्यमान गृहीत धरून प्रायमुव्ह एजन्सीकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. या एजन्सीच्या अहवाल व विकास आराखड्यानुसार आंबिल ओढा विकसनाचे काम हाती घेण्यात आले आहे. विकास आराखड्यामधील नाला मार्गिका दुरुस्तीच्या कामामुळे १३० झोपडपट्टीधारक बाधित होत आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याच्या नियोजन करण्यासाठी १६ मार्च रोजी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यानुसार नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
-----
७ जुलैपर्यंत स्थगिती
ओढ्याच्या कामात बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या नियोजनाची माहिती न्यायालयासमोर मांडण्यात कमी पडल्याचे विधी विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. येत्या ७ जुलैपर्यंत स्थगिती आहे. ७ जुलै रोजी पालिकेने केलेल्या उपाययोजना, रहिवाशांची केलेली व्यवस्था, बजावलेल्या नोटिसा, घरे हलविण्यास दिलेला वेळ याबाबत सविस्तर माहिती न्यायालयाला देणार असल्याचे सांगण्यात आले.