लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रशासनाने सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली. परंतु, हॉटेल व रेस्टॉरंट बंद केली. यामुळे बाहेरगावाहून माल घेऊन येणारे गाडीवाले, ग्राहक, कामगार, हमाल आदींच्या जेवणाची गैरसोय होणार आहे. त्यामुळे ज्या भागात होलसेल मार्केट आहे, तेथील हॉटेल, खाणावळी सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी दि पूना मर्चंट्स चेंबरने केली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढता असतानाही शासनाने दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिल्याच्या निर्णयाचे चेंबरने स्वागत केले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट पुढील सात दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्दल मात्र नाराजी आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांकडे येणाऱ्या कामगारांची गैरसोय होणार आहे. परगावाहून येणाऱ्या ग्राहकांची आणि माल घेऊन येणाऱ्या गाडीवाल्यांसह दुकानात काम करणाऱ्या कामगारांची गैरसोय होणार असल्याचे चेंबरचे म्हणणे आहे.
=====
काँग्रेसवर आंदोलनाची वेळ आणू नका
“प्रशासनाने संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंतची जाहीर केलेली संचारबंदी पुणेकरांसाठी जाचक आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी होती. या काळात किमान कष्टकऱ्यांच्या पदरी अर्धा दिवस जगण्यासाठी पडत होता. प्रशासनाने निर्णयाचा फेरविचार करुन रात्री आठ ते सकाळी सहा या वेळेतील संचारबंदी सुरु ठेवावी. पालिका आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसला याविरोधात आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये.”
- गोपाळ तिवारी, प्रवक्ते, महाराष्ट्र कॉंग्रेस
===
घडी विस्कटवणारा निर्णय
“प्रशासन आणि शासन ठोस निर्णय का घेत नाही? अशा निर्णयाने बसलेली घडी बिघडते. गरीब कष्टकरी तसेच व्यापारीवर्गाचे खूप नुकसान होऊ शकते. लोकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना प्रशासकीय अधिकाऱ्यांना येणार कशी? पुन्हा व्यवसाय सुरू करायचा म्हटले तरी परत महिन्या-दोन महिन्यांनी लॉकडाऊन होईल की काय, या भीतीने लोक त्रस्त झाले आहेत. ‘क्राईम रेट’, ‘चाइल्ड मॅरेज’, ‘चाईल्ड लेबर’ मोठ्या प्रमाणावर वाढेल. याबाबत गांभीर्याने विचार झाला पाहिजे.”
- अॅड. पौर्णिमा गादिया, बाल हक्क कार्यकर्त्या