पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांची परिपत्रकाद्वारे माहिती ; भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहरच्या आंदोलनाला यश
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात वानवडी भागातील व शहरातील इतर अन्य शाळांमध्ये २०२० व २०२१ वर्षाची संपूर्ण फी भरण्यास सक्ती करण्यात येत होती. विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येत होते. त्यामुळे याविरोधात भारतीय जनता पार्टी पुणे ओबीसी मोर्चातर्फे निवेदन देऊन आंदोलनही करण्यात आले. या मागणीला यश आले असून, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचेही आॅनलाईन शिक्षण सुरु ठेवण्याचे परिपत्रक जारी केले आहे.
ओबीसी मोर्चा भाजपा पुणे शहर अध्यक्ष योगेश पिंगळे, पुणे शहर ओबीसी उपाध्यक्ष विशाल बाळासाहेब केदारी यांनी जिल्हाधिकारी व प्राथमिक-माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना २ फेबुवारी २०२१ रोजी निवेदन दिले होते. विद्यार्थ्यांकडून ५० टक्केपेक्षा कमी फी आकारण्यात यावी, अशी विनंतीही केली होती. निवेदन दिल्यानंतर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आले. परंतु १४ मे २०२१ पर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे १७ मे रोजी माजी आमदार व ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण अधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले.