घोडेगाव : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आसाणे रस्त्यालगत घेण्यात आलेल्या जागेवर प्लॉट आखण्याचे काम सुरू असून, लवकरच हे प्लॉटवाटप व घरांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. माळीण गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आमडे गावच्या हद्दीत ८ एकर जागा शासनाने संतोष व संदीप लुमा असवले यांच्याकडून विकत घेतली आहे. या जागेवर घरे व मूलभूत सोईसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. या जागेची सुधारणा व घरे बांधण्यासाठी महसूल विभाग ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करणार आहे. त्यानंतर जागेचे सपाटीकरण, रस्ते ही कामे सुरू होतील. हे प्लॉटवाटप व घरांच्या भूमिपूजन कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळीणला यावे, अशी सूचना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभा सभागृहात केली होती. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळीणला येण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माळीणमध्ये मुख्यमंत्री तसेच महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. (वार्ताहर)
माळीणसाठी प्लॉट टाकण्याचे काम सुरू
By admin | Published: April 20, 2015 4:16 AM