मुंबई - आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच राज्यसभा निवडणुका पार पडत आहेत. राज्यसभेच्या देशातील ५६ जागांसाठी तर महाराष्ट्रातील ६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा काल १५ फेब्रुवारी रोजी अंतिम दिवस होता. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रातून भाजपाने ३ जणांना उमेदवारी दिली असून त्यामध्ये एक नाव माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं आहे. अशोक चव्हाणांना संधी मिळाल्याने भाजपामधील निष्ठावाना कार्यकर्त्याची संधी हुकल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.
भाजपाचे निष्ठावंत म्हणून गेली कित्येक दशकं काम करणाऱ्या माधव भंडारी यांना यंदा राज्यसभेवर संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, यावेळीही माधव भंडारी यांचे नाव केवळ चर्चेपुरतेच राहिले. भाजपाने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली. मेधा कुलकर्णी यांच्यावर विधानसभा निवडणुकांवेळी झालेला अन्याय दूर करत, पक्षाने त्यांना आता दिल्ली वारीची संधी दिली. मात्र, माधव भंडारी यांना यावेळीही प्रतिक्षा यादीतच ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळेच, माधव भंडारी यांचे पुत्र चिन्मय भंडारी यांनी ट्विटरवरुन भली मोठी पोस्ट लिहित मनातील खदखद बोलून दाखवली.
चिन्मय यांची ट्विटर पोस्ट
चिन्मय यांनी पोस्ट लिहितानाचा ही माझी वैयक्तिक भावना असल्याचे स्पष्ट केले आहे. मला आज माझ्या वडिलांबद्दल लिहायचं आहे, असेही त्यांनी म्हटलं.
माझे वडिल माधव भंडारी यांनी १९७५ ला जनसंघ/ जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्यानंतर १९८० मध्ये भाजपची निर्मिती झाली. आता, त्याला जवळपास ५० वर्ष झाले. या ५० वर्षांच्या काळात माधव भंडारी यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी संघटना बांधणीचं काम केलं. हजारो लोकांना, शेकडो गावांना मदत केली. सत्तेच्या गैरवापराविरोधात माधव भंडारी यांनी भूमिका मांडली, सामान्य लोकांचे प्रश्न मांडले. राज्यात २००८ ते २०१४ या कालावधी आघाडी सरकार असताना भाजपाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी कणखरपणे भूमिका बजावली.
२०१४ मध्ये पक्षाचं सरकार आल्यानंतर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताना आणि ते प्रश्न सोडवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. राज्यातील स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं, अनेक पुस्तकाचं लेखन केलं, असं चिन्मय भंडारी यानं ट्विटरवरुन म्हटलं आहे. हे सर्व सुरु असताना प्रसिद्धीच्या झोतापासून ते कायम दूर राहिले. आपल्या पदाचा आणि प्रभावाचा वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी कधीही वापर केला नाही. म्हणूनच, राज्यात ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं अशा राजकीय नेत्यांपैकी एक म्हणजे माधव भंडारी आहेत, असेही मुलगा चिन्मय यांनी म्हटले. तसेच, सिंधुदुर्गमधील घरासाठीच्या वीज जोडणीचा प्रसंगही त्यांनी येथे सांगितला.
मी माझ्या जीवनात १२ वेळा असं अनुभवलं की, वडिलांचं नाव १२ वेळा विधानसभा किंवा राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी चर्चेत आलं, पण उमेदवारी मिळाली नाही. पण, पक्षाच्या नेतृत्त्वाला प्रश्न विचारायचे नाहीत, असेही चिन्मय यांनी म्हटलं आहे. कारण, माधव भंडारी यांनी याबाबत जाहीरपणे कधीच भाष्य केलं नाही. ज्या पक्षाच्या उभारणीसाठी आयुष्यभर काम केलं, त्याला दुखावण्याचं काम त्यांनी केलं नाही. प्रकृती बरी नसताना आणि आयुष्यातील जोडीदार गमावल्यानंतरही पक्षासाठी काम करणं त्यांनी थांबवलं नाही, अशी खंत चिन्मय यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, काही लोक ज्यांना पक्षानं मंत्री केलं, खासदार केलं अशांनीही आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हणताना मी पाहिलंय, असे म्हणत नाव न घेता भाजपासोबत आलेल्यांना अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला.