निमोणे (ता. शिरूर) आणि परिसरामध्ये गेली दोन दिवसांपासून संततधार पाऊस चालू आहे. दिवसभर आणि रात्रीही पाऊस हजेरी लावत आहे. या भीज पावसाचे पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणे जिरत आहे. त्यामुळे जमिनीला चांगला ओलावा निर्माण झाला आहे. ओढे-नाले, पाझर तलाव यांनाही थोड्याफार प्रमाणात पाणी आले आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, त्याच वेळी सर्व जनजीवन ठप्प झाली आहेत. सध्या खरीप हंगामातील संकरित बाजरी पीक तयार झाले आहे. ही बाजरी काढणे आणि त्यांची मळणी करणे हे काम सध्या पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, संततधार पावसामुळे या बाजरीची काढणी खोळंबली असून तयार पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शेतीची सर्वच कामे ठप्प झाली आहेत.
या संततधार पावसाने घरगुती तसेच शेतीपंपाच्या वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. तो सुरळीत करण्यासाठी स्थानिक पातळीवरील कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत करताना दिसत आहे. गेली पंधरा दिवसांपूर्वी येथील कर्मचारी लहू केदारी हे असेच विजेचे काम करत असताना खांबावर अचानक विजेचा धक्का लागून कोसळले होते. त्यांना डोक्यास व इतरत्र ही गंभीर स्वरूपाची इजा झाली होती. परंतु दवाखान्यात उपचार घेऊन बरे वाटल्यानंतर ते त्वरित सेवेत रुजू झाले असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या या कार्याचे परिसरातील युवकांमधून मोठे कौतुक होत आहे.
फोटो : निमोणे (ता. शिरूर) येथे संततधार पावसात वीजपुरवठा सुरू करताना कर्मचारी.
( फोटो मेलव्दारे पाठवत आहे )