लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस होत आहे. भोर, वेल्हे, मुळशी, हवेली व भात लागवडीच्या अन्य क्षेत्रातही ४ ते ५ इंच पाऊस झाल्याने आता लवकरच भातलावणीला सुरुवात होईल.
जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र २ लाख १९ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ६० हजार हेक्टर क्षेत्र भाताचे आहे. त्याच क्षेत्रात गेले काही दिवस चांगला पाऊस होत आहे. जमीन आता पूर्ण ओली झाली आहे.
भात रोपवाटिकेतील रोपे २१ दिवसांनी लावणीसाठी तयार होतात. आता रोपवाटिका १० ते १५ दिवसांच्या झाल्या आहेत. आणखी ८ दिवसांनी रोपे लावून घेण्यासाठी पूर्ण तयार होतील. त्यानंतर लावणी सुरू होईल. मागील वर्षी भाताचे क्षेत्र ५९ हजार हेक्टर होते. यंदा त्यात १ हजार हेक्टरची वाढ झाली आहे.
जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यांतही पावसाचे प्रमाण चांगले आहे. बाजरी आणि कडधान्ये, तेलबियांच्या पेरण्यासाठी या पावसाचा उपयोग होईल. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने वाफसा येताच पेरण्या लवकर चालू होतील. शेतकऱ्यांनी बियाणे, खतांची निवड काळजीपूर्वक करावी. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.