पुणे : देशभरातील लहान शहरं आणि गावांमध्ये लघुअभ्यासक्रमांच्या माध्यमातून चित्रपटविषयक शिक्षणाची दालनं खुली करण्यासाठी फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)ने कॅनन कंपनीबरोबर बुधवारी सामंजस्य करार केला. संस्थेच्या स्किलिंग इंडिया इन फिल्म अँड टेलिव्हिजन (स्किफ्ट) या उपक्रमांतर्गत कौशल्य विकसनसाठीचे हे अभ्यासक्रम राज्य सरकार, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यातून सुरू केले जाणार आहेत. राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, कॅनन इंडियाचे अध्यक्ष काझुटाडा कोबायाशी आणि एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार झाला. या लघुअभ्यासक्रमांपैकी काही अभ्यासक्रम हे राष्ट्रीय कौशल्य विकास समितीच्या माध्यमातून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेखाली आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती भूपेंद्र कँथोला यांनी दिली. डिजिटल छायालेखन, माहितीपट निर्मिती, पटकथा लेखन, चित्रपट रसग्रहण हे लघुअभ्यासक्रम सुरू केले जाणार आहे.(प्रतिनिधी)
चित्रपट निर्मितीप्रक्रियेसाठी करार
By admin | Published: March 17, 2017 2:07 AM