पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक उपायजोजना करण्यासाठी तसेच रूग्णांना सेवा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर्सवर कंत्राठी पद्धतीने आराेग्य कर्मचाऱ्यांची भरती तिन महिन्यांसाठी करण्यात आली होती. त्यांना कार्यमुक्त केल्याने जवळपास २०० कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी करत जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.
साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत तिन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी त्यांची नेमणुक करण्यात आली होती. कोरोना काळात त्यांनी रूग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण वाढीचा वेग जिल्ह्यात मंदावला आहे. यामुळे अनेक तालुक्यातील कोविड सेंटर बंद करन्यात आली. कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांनाही त्यांची मुदत संपल्याने कार्यमुक्त करण्यात आले. मात्र, त्यांना कायमस्वरूपी कामात घेण्यात यावे या साठी त्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या धरत धरणे आंदाेलन केले. जिल्हा परिषदेत कुणी निवेदन न स्विकारल्याने आंदोलकांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले.
कोविड १९ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजु करणून घेणे, अंशकालीन कर्मचारी घोषित करून शासनाच्या विविध विभागातील जागा कोरोना कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवणे, कोविड नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ज्यांनी कोविड आरोग्य कर्मचारी म्हणून ९० दिवस काम केले असेल त्यांच्या साठी शासनाने आरोग्य विभागातील सर्व पदासाठी ५० टक्के आरक्षण द्यावे अशा विविध मागन्या या आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केल्या आहेत.
फोटो : जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करतांना कंत्राटी आरोग्य कर्मचारी.