पुणे : महापालिकेच्या व्हेईकल डेपोकडील कंत्राटी चालकांना दर महिन्याच्या १० तारखेच्या आत मासिक वेतन देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेले आहेत. मात्र, या विभागासाठी चालक पुरविणाऱ्या संबंधित ठेकेदारांनी १० तारखेच्या आत सेवकांचे मासिक वेतन अद्याप दिलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत तातडीने लक्ष घालून त्यांना वेळेत वेतन न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कामगार मंचाने महापालिका आयुक्तांना दिला आहे. महाराष्ट्र कामगार मंचाचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी या संदर्भात महापालिका कुणाल कुमार यांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या व्हेईकल डेपोतील कंत्राटी चालकांबाबत कंत्राटी कामगार अधिनियम १९७० या अधिनियमाची अंमलबजावणी होत नाही. संघटनेने या संदर्भात वारंवार प्रशासनाशी चर्चा करून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. प्रशासनानेही संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन अधिनियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. मात्र, संबंधित अधिकारी त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. ठेकेदारांकडील सेवकांना दर महिन्याच्या १० तारखेच्या आत मासिक वेतन देण्याबाबतही आदेश दिले होते; परंतु आजतागायत ठेकेदारांकडून विहीत मुदतीत वेतन दिले जात नाही, असा आरोपही मोहिते यांनी केला आहे. दरम्यान, महापालिकेतील कंत्राटी कामगारांना नेमणूक पत्र द्यावे, कामगारांचे वेतन बँकेद्वारे देण्यात यावे, सुरक्षा साधने पुरवावीत, सेवकांप्रमाणेच चालकांना फायदे द्यावेत अशा मागण्याही संघटनेने केल्या आहेत.
कंत्राटी चालकांना वेतन नाहीच
By admin | Published: July 21, 2015 3:17 AM