पुणे : महापालिकेच्या विविध विभागांमध्ये तुटपुंज्या वेतनावर काम करीत असलेल्या १५०० सुरक्षारक्षकांचे वेतन महापालिकेच्या दिरंगाईमुळे ३ महिन्यांपासून रखडले आहे. सुरक्षारक्षक ज्या ठेकेदारांमार्फत काम करतात, त्यांची बिले मंजूर करण्यास मुख्यसभेने उशीर लावल्याने त्यांचे वेतन रखडले आहे. दर महिन्याच्या एक तारखेला पगार, मानधन घेणाऱ्या प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सुरक्षारक्षकांच्या वेतनाचा विषय गांभीर्याने घेतला जात नसल्याने सातत्याने त्यांचे वेतन रखडत आहे. सुरक्षारक्षकांच्या वेतनाची रक्कम ठेकेदाराला देण्याचे उशिराने मुख्यसभेकडून मंजूर करण्यात आली. त्यामुळे आता तरी ठेकेदाराने वेतन करावे, अशी मागणी सुरक्षा रक्षकांकडून करण्यात येत आहे. महापालिकेच्या विविध विभागात सुमारे २ हजार १०० सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. त्यापैकी १६०० सुरक्षारक्षक ठेकेदाराच्या माध्यमातून नेमले आहेत. विविध इमारती, उद्याने, बीआरटी मार्ग इथे सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. खासगी ठेकेदारामार्फत कंत्राटी पद्धतीने त्यांची नेमणूक करण्यात येते. त्यांना दर महिना किमान १२ हजार रुपये वेतन द्यावे,असे पालिकेने करारात नमूद केले आहे. मात्र, प्रत्यक्षात ठेकेदारांकडून सुरक्षारक्षकांच्या हातात खूपच कमी रक्कम ठेवली जाते. सुरक्षारक्षकांच्या बँक खात्यांमध्ये पगार जमा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे त्यांचे वेतन रखडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
कंत्राटी सुरक्षारक्षकांचे वेतन पुन्हा रखडले
By admin | Published: February 22, 2016 4:08 AM