पुणे : भावा भावामधील वाद मिटविण्यासाठी मदत करत असताना एका बांधकाम व्यावसायिकाने थेट कुख्यात डॉन छोटा राजनला नगरसेवक अजय भोसले यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र कुमार अगरवाल यांच्या अटकपूर्व जामीनला विरोध करताना सीबीआयने दाखल केलेल्या अर्जातून ही माहिती पुढे आली आहे. यावर शिवाजीनगर येथील सीबीआय न्यायालय शुक्रवारी निर्णय देणार आहे. याबाबतची माहिती अशी, तत्कालीन नगरसेवक अजय भोसले हे ११ नोव्हेबर २००९ रोजी सकाळी साडेदहा वाजता मोटारीतून निवडणुकीतील प्रचाराला जात असताना कोरेगाव पार्क येथे त्यांच्या गाडीवर गोळीबार केला होता. त्यात त्यांचा चालक शकील सय्यद हे जखमी झाले होते. याप्रकरणाचा पुणे पोलिसांना छडा न लागल्याने हा गुन्हा सीआयडीकडे सोपविला होता. डिसेंबर २०१० मध्ये सीआयडीने गोळीबार करणाऱ्या दोघांची नावे निष्पन्न केली होती. मात्र, त्यांना कोणी सुपारी दिली़ या हल्ल्यामागे कोण आहे, याचा शोध न लागल्याने अजय भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या गुन्ह्याचा तपास सीबीआयला दिला. त्यातून बांधकाम व्यावसायिक रामकुमार अगरवाल व एस. के. अगरवाल यांच्यातील कौटुंबिक मालमत्तेवरुन वाद होता. त्यात छोटा राजन याने अजय भोसले यांना मध्यस्थी करण्यास सांगितले होते. मात्र, तो त्यांचा कौटुंबिक मामला असल्याने भोसले यांनी मध्यस्थी करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यानंतर रामकुमार अगरवाल यांच्याबरोबर अजय भोसले हे सारखे असतात. याकारणावरुन एस. के. अगरवाल यांनी छोटा राजनला भोसले यांची सुपारी दिल्याने निष्पन्न झाले. छोटा राजनला भारतात आणल्यावर पोलिसांनी अटक केली. सीबीआयने त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ही बाब समोर आल्याचे निष्पन्न झाल्याचे सीबीआयने पुण्यातील सीबीआय न्यायालयात एस. के. अगरवाल यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करताना सांगितले आहे.
अजय भोसले यांच्यावर गोळीबार करण्याची छोटा राजनला सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 12:20 PM
तत्कालीन नगरसेवक अजय भोसले हे ११ नोव्हेबर २००९ रोजी निवडणुकीतील प्रचाराला जात असताना कोरेगाव पार्क येथे त्यांच्या गाडीवर गोळीबार..
ठळक मुद्दे सीबीआयच्या तपासातून माहिती आली समोर : न्यायालय शुक्रवारी निर्णय देणार