कंत्राटी कामगार संघटनेची मागणी : ''लोकमत''मधील वृत्ताची दखल घेत ससून प्रशासनाला पत्र
पुणे : ससून रुग्णालयात तुटपुंज्या पगारावर आणि तीन महिन्यांच्या कंत्राटावर वॉर्डबॉय काम करत आहेत. ''जीवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ तीनशे रुपये दाम!'' या आशयाचे वृत्त २२ मे रोजी 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत कंत्राटी कामगार संघटनेतर्फे रुग्णालय प्रशासनाला पत्र पाठवले आहे. रुग्णालय प्रशासनाने कामगारांना पूर्वलक्षी काळापासूनचा कायदेशीर लाभ मिळवून देण्यास मुख्य व्यवस्थापन/कंत्राटदार यांना भाग पाडावे, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
ससून रुग्णालयात मृतदेह हाताळण्याचे काम करणा-या कंत्राटी कामगारांना शासनाने जाहीर केलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन देणे, आठ तासांपेक्षा जास्त कामाचे वेतन न देणे, वेतनातून नियमापेक्षा जास्त कपात करणे, कोरोना काळात कामगारांना सुरक्षा कवच न देता काम करून घेणे इत्यादी प्रकारचे शोषण होत आहे. कंत्राटी कामगार कायद्याचे मुख्य व्यवस्थापन व कंत्राटदार यांच्याकडून उल्लंघन होत आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात लक्ष घालून जानेवारी २०२० पासून ते आजतागायत वेळोवेळी नेमलेल्या संबंधित कामगारांची व कंत्राटदारांची कायदेशीर माहिती मुख्य व्यवस्थापनाकडून घेऊन कामगारांना पूर्वलक्षी काळापासूनचा कायदेशीर लाभ मिळवून देण्यास मुख्य व्यवस्थापन/कंत्राटदार यांना भाग पाडावे. चुकीच्या प्रथांचा अवलंब करणारे अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्यावर कारवाई करून संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, अशी मागणी कंत्राटी कामगार संघटना, पुणे जिल्हा यांच्यातर्फे सहसचिव मोहन पोटे आणि सरचिटणीस वसंत पवार यांनी केली आहे.