पुणे : पार्सलच्या निकृष्ट सेवेमुळे ४५ किलो धान्याचे नुकसान करून भरपाईही किरकोळच देण्याची तयारी दाखविणाऱ्या एसटी महामंडळाच्या कंत्राटदाराला ग्राहक मंचाने सुनावले. निकृष्ट सेवा देऊन ग्राहकाला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागल्याने जिल्हा ग्राहक न्याय मंचाने कंत्राटरादराने तक्रारदाराला ३ हजार रुपये देण्याचा आदेश दिला. या प्रकरणी वारजे येथील संतुक पाटील यांनी जळगाव येथील अंकल पार्सल अँड फॉरवर्ड्स प्रा. लि. या कंपनीविरुद्ध न्याय मंचाकडे तक्रार केली होती. एसटी महामंडळाने अंकल पार्सल या कंपनीला माल वाहतुकीसाठी कंत्राटदार म्हणून नियुक्त केले आहे. पाटील यांच्या नातेवाइकाने परभणी येथून एसटीच्या पार्सल सेवेद्वारे धान्याच्या पाच गोण्या पुण्यात पाठविल्या होत्या. पाटील यांनी १२ मे २०१३ रोजी वाहतुकीचा १ हजार ५३ रुपये एवढा खर्च देऊन गोण्या ताब्यात घेतल्या. तेव्हा तेथील कामगारांनी मालाची व्यवस्थित हाताळणी केली नाही, पाटील यांच्या एका गोणीवर लाल रंगाचा रासायनिक पदार्थ सांडून ३० किलो तूरडाळ आणि १५ किलो मूगडाळ खराब झाली. त्यामुळे साडेतीन हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार पाटील यांनी एसटी महामंडळ आणि संबंधित कंपनीकडे केली. या कंपनीने केवळ ६०० रुपये देण्याची तयारी दाखविली. ती मान्य नसल्याने पाटील यांनी ग्राहक न्याय मंचाकडे दाद मागितली. न्याय मंचाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली आणि पुराव्यांच्या आधारे पाटील यांची मागणी योग्य असल्याचे मत निकालात नोंदविले. कंपनीने निकृष्ट दजार्ची सेवा दिल्याने पाटील यांना २ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीपोटी १ हजार रुपये खर्च द्यावा, असा आदेश न्याय मंचाने दिला. (प्रतिनिधी)४एखाद्या धान्यावर रासायनिक द्रव्य सांडले असेल, तर ते पूर्ण धान्य खाण्यास उपयुक्त राहत नाही. कंत्राटदाराने पार्सल खराब करून निकृष्ट दर्जाची सेवा दिली आहे. शिवाय, अशा परिस्थितीत त्याची नुकसानभरपाई ही केवळ ६०० रुपये देण्याची तयारी दाखविणे, हीदेखील कंत्राटदाराच्या सेवेतील त्रुटीच आहे. त्यामुळे निकृष्ट सेवेबद्दल २ हजार व तक्रारीच्या खर्चासाठी १ हजार रु. कंत्राटदाराने द्यावेत, असे निरीक्षण मंचाने नोंदवले.
कंत्राटदाराला ३ हजार रुपयांचा दंड
By admin | Published: February 19, 2015 1:12 AM