पुणे : माहिती अधिकारामध्ये माहिती घेऊन महापालिकेच्या ठेकेदारांना ब्लॅकमेल करून तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात भाजपाच्या निलंबित कार्यकर्ता ओंकार कदमसह गजेंद्र मोरे आणि सूरज दगडे यांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ओंकार दिलीप कदम (वय ३५, एरंडवणा), गजेंद्र तुळशीदास मोरे (वय ३५, कस्तुरबा वसाहत), आणि सूरज राजेंद्र दगडे, (वय २९, बिबवेवाडी) अशी या तिघांची नावे आहेत. निखिल कन्स्ट्रक्शनच्या वतीने औंध येथील स्मार्ट सिटीअंतर्गत एक व राजीव गांधी पूल ते पुणे विद्यापीठ चौक येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाबाबत माहिती अधिकारामध्ये माहिती मागवून ओंकार कदम व त्याच्या साथीदारांनी कंपनीच्या ठेकेदारांना पैसे देण्यासाठी ब्लॅकमेल सुरू केले. काम सुरू ठेवण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांची मागणी केली. पैसे मिळत नाही म्हटल्यावर कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली. अधिकार नसताना कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी रस्ता उखडला. पैसे दिले नाहीत तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू, कामावर असलेल्या वाहनांची तोडफोड करू अशा स्वरूपाच्या धमक्या देण्याचे प्रकार सुरू झाले. २६ एप्रिल रोजी परिहार चौकात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी ओंकार कदम, मोरे व दगडे हे तिघे आले. त्यांनी तेथे गोंधळ घालत काम बंद करा अन्यथा तुमच्या गाड्या फोडू अशी दमदाटी कर्मचाऱ्यांना केली. तुमच्या टेंडरबाबत मनपाकडे माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविली आहे. त्या माहितीच्या आधारे तुमच्या कंपनीला काळ्या यादीत टाकून तुमचे काम रद्द करू अशी धमकी देऊन तेथून निघून गेले.यानंतर हे तिघे २७ एप्रिल रोजी कस्तुरबा गांधी वसाहतीजवळ सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आले आणि पैसे नाही दिले तर हात पाय तोडून टाकण्याची धमकी देत धक्काबुक्की केली. त्यानंतर नितीन पायगुडे यांनी काल रात्री चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. (प्रतिनिधी)कदम निलंबित पदाधिकारीओंकार कदम मागील काही वर्षांपासून माहिती अधिकार क्षेत्रात काम करत आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी घेतलेला पक्षनिधी ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना परत मिळावा यासाठी भाजपाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. यानंतर त्याला पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
ठेकेदाराकडे १ कोटीची खंडणी मागणारे अटकेत
By admin | Published: April 30, 2017 5:22 AM