पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विशेष कार्याधिकारी, सुरक्षा संचालक, अंतर्गत हिशोब तपासणीस, आयटी मॅनेजर, सहायक वसतिगृहप्रमुख व समन्वयक ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. या पदांसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित केली असून १६ जानेवारीपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत.राज्य शासनाकडून विद्यापीठातील अनेक रिक्त पदे भरली गेलेली नाहीत. तीन वर्षांपूर्वी उपकुलसचिव व इतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र शासनाकडून काही कारणांमुळे ती थांबविण्यात आली. त्यामुळे रिक्त पदे अद्याप भरली गेलेली नाहीत. त्यामुळे या पदांच्या कायमस्वरूपी भरती प्रक्रियेला मंजुरी मिळण्याची वाट न पाहता त्यातील काही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. सुरक्षा विभागाच्या संचालकांचे पद ५ वर्षे कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असून या पदासाठी ८५ हजार रुपये इतके वेतन निश्चित करण्यात आले आहे. विशेष कार्याधिकारी हे पद १ वर्षासाठी असून त्यासाठी ५० हजार रुपये वेतन दिले जाईल. अंतर्गत हिशोब तपासणीस व आयटी मॅनेजर हे पद ५ वर्षे कालावधी, सहायक वसतिगृहप्रमुखपद दोन वर्षे कालावधीसाठी भरले जाणार आहे. समन्वयकपद २० वर्षे कालावधीसाठी भरले जाणार आहे.अखेर जाहिराती निघाल्यासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गेल्या वर्षभरात सुरक्षा संचालक, विशेष कार्याधिकारी व इतर काही पदे कोणतीही जाहिरात न देता भरण्यात आली होती. विद्यापीठ कायद्यातील तरतुदींचा हा भंग असल्याचे स्पष्ट करून याविरोधात उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अखेर विद्यापीठातील पदभरतीसाठी रीतसर जाहिरात काढण्यात आली आहे. त्याचबरोबर या पदांसाठी लेखी परीक्षा, मुलाखत आदी प्रक्रिया पार पाडून निवड केली जाणार आहे.समन्वयकपद २० वर्षे कालावधीसाठी भरणारविद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या रिक्त पदांचा कालावधी एक वर्ष ते ५ वर्षे यादरम्यान आहे. मात्र समन्वयक या नावाचे एक पद तयार करण्यात आले असून ते २० वर्षे इतक्या दीर्घ कालावधीसाठी भरले जाणार असल्याचे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या पदासाठी ९३००-३४८०० अशी वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेची पदवी व प्रशासकीय कामकाजाचा ५ वर्षांचा अनुभव अशी पात्रता यासाठी निश्चित करण्यात आली आहे. मात्र समन्वयकपदाची नेमकी जबाबदारी काय असेल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर कंत्राटी पद २० वर्षे कालावधीसाठी का भरले जात आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विद्यापीठातील पदांची कंत्राटी पद्धतीने भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 1:59 AM