पुणे : ज्येष्ठ संशोधक डॉ. सुरेश जाधव यांचे दीर्घ आजाराने बुधवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या नावावर जगभरातील अनेक पेटंट नोंदविले गेले आहेत.डॉ. सुरेश जाधव हे मूळचे बुलडाण्याचे. त्यांनी नागपूर विद्यापीठातून फार्मसीमध्ये पीएच.डी. मिळविली.
प्रारंभीच्या काळात त्यांनी नागपूर विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठ येथे शिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी हापकीनमध्ये संशोधक म्हणून लस उत्पादनासंबंधी कार्याला सुरुवात केली. डॉ. सुरेश जाधव १९७९ मध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये रुजू झाले. त्यांचा कार्यकाळ मार्च २०२२ पर्यंत असला तरी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी ऑक्टोबरमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
“सीरम कुटुंब आणि भारतीय लस निर्मिती उद्योगाने डॉ. सुरेश जाधव यांच्या रूपाने दीपस्तंभ गमावला आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासमवेत आहेत,” अशा शब्दांत ‘सीरम’चे आदर पूनावाला यांनी आदरांजली वाहिली.