पॉझिटीव्ह रेट ४.७० टक्के;
ग्रामीण भागावर जास्त लक्ष देण्याची गरज
बारामती : बारामतीतील कोरोना परिस्थिती सुधारली असली तरी चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे ग्रामीण भागात बाधितांचे प्रमाण आढळून येऊ लागले आहेत. सध्या बारामतीचा पॉझिटिव्ह रेट ४.७० टक्के आहे. ४४७ रुग्ण उपचार घेत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर असल्यामुळे बाधितांच्या संपर्कातील येणा-यांची तातडीने चाचणी करण्यात येत आहे. परिणामी कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
मागील दीड वर्षांपासून बारामतीमध्ये आतापर्यंत २७ हजार ३८८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २६ हजार ३८४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ६९५ रुग्णांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. सध्या बारामतीचा एकूण कोरोना मृत्यूदर १.९ टक्क्यांवर आला आहे. बारामती शहर व तालुक्यात प्रशासनाच्या वतीने अँटिजन चाचणी मोहिम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. बारामती शहर व तालुक्यात सुपर स्प्रेडर सर्वेक्षणा अंतर्गत १० जूनपासून अँटिजन तपासणी सुरू करण्यात आली आहे. १० हजारांपेक्षा जास्त तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यासाठी फिरत्या प्रयोगशाळेची मदत घेण्यात येत आहे. सध्या तालुक्यातील पणदरे, कारखेल, मोरोळी, झारगडवाडी, कांबळेश्वर, पारवडी, ब-हाणपूर आदी गावांमध्ये रुग्णसंख्या १० च्या पुढे आहे. त्यामुळे ही गावे हॉटस्पॉट आहेत. या गावांमध्ये अँटीजेन तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दरम्यान, या आठवड्यापासून बारामती शहर व तालुक्यात ‘वीकेंड लॉकडाऊन’ रद्द करण्यात आला आहे. परिणामी श्रावण महिन्याच्या सुरूवातीला बाजारपेठ नव्या जोमाने सुरू झाली आहे. मात्र वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे व कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
-------------------------------
बेड उपलब्धता
प्रकार - एकूण बेड -शिल्लक
आॅक्सिजन - ८२८ - ६३८
आयसीयू- ११६ - ७८
व्हेंटिलेटर- ९१ -४५
सीसीसी- १,५४४ -१,३३८
------------------------------------
बारामती शहर व तालुक्यात आतापर्यंत १ लाख ७७ हजार ५६६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर म्युकरमायकोसिसचे बारामतीमध्ये आतापर्यंत १७ रूग्ण आढळून आले होते. तर बाहेरील तालुक्यातील २० रुग्णांनी बारामतीमध्ये उपचार घेतले होते. सध्या म्युकरमायकोसिस २ रूग्ण उपचार घेत आहेत.
-------------------------
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुस-या लाटेतील रूग्ण कमी स्कोरमध्ये देखील गंभीर होत होते. त्यामुळे दुस-या लाटेमध्ये गंभीर रुग्णांची तीव्रता अधिक होती. आता पुन्हा रूग्ण संख्या वाढू नये म्हणून मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे सर्वांची जबाबदारी आहे.
- डॉ. सदानंद काळे
वैद्यकीय अधीक्षक,
बारामती उपजिल्हा रुग्णालय
----------------------------