मंचर : राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर तसेच रुग्णालयांना होणाऱ्या ऑक्सिजन वाटपावर नियंत्रण प्रस्थापित करावे, अशी आग्रही मागणी शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आढळराव पाटील म्हणाले की, सध्या राज्यात दररोज १५०० टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असून रुग्णांना ऑक्सिजनची गरज सुमारे १७०० ते १७५० टनच्या आसपास आहे. राज्यात पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक असली तरी शासनाने पुरवठा वाढीसाठी ठोस पावले उचलल्यास हा फरक निघून येण्यास वेळ लागणार नाही. तत्पूर्वी रुग्णालयांना पुरवठादारांकडून मिळणाऱ्या ऑक्सिजनवर नियंत्रण ठेवून प्रत्येक २४ तासांनी त्या त्या रुग्णालयांना गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा करण्यावर शासनाने अधिकारी नेमून लक्ष ठेवले पाहिजे. तसेच कोणत्या रुग्णाला किती ऑक्सिजनची आवश्यकता आहे याच्यावर देखील शासकीय वॉच ठेवून ऑक्सिजनचा सर्रास वापर न करता गरजेनुसार वापर करण्यासाठी व वापरात सुसूत्रता निर्माण व्हावी यासाठी पावले उचलावीत.
प्रत्येक रुग्णालयाला १२ तासांचा अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा पुरवण्यात येऊन त्याचा वापर केवळ बफर कालावधीकरिता म्हणजेच २४ तासांनंतरही काही कारणांमुळे उत्पादकामार्फत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास अतिरिक्त साठ्यातील ऑक्सिजन उपयोगात आणण्यासाठी शासनाने रुग्णालयांना परवानगी द्यावी. ऑक्सिजन उत्पादन करणारी कंपनी ते रुग्णालय यांच्यातील वाहतूक व्यवस्था राज्य शासनाच्या अमलाखाली येणे अतिशय गरजेचे असून त्याद्वारे ऑक्सिजनची वाहतूक सुरळीतपणे होऊन वेळेवर संबंधित रुग्णालयास ऑक्सिजन पुरवठा होण्यास मोठी मदत होऊ शकेल. ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने प्रभावीपणे शासकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र यंत्रणा राबविल्यास पुढील सात-आठ दिवसांतच ऑक्सिजन वितरण व्यवस्थेवर सुयोग्य शासनाचे नियंत्रण प्रस्थापित होऊन त्याद्वारे रुग्णालयांना वेळेवर व रुग्णांना गरजेनुसार ऑक्सिजन उपलब्ध होऊन रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी मोठी मदत होईल, असे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करून या महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाश टाकून राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे.