पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वप्रकारे दक्षता घेतली जात असून, पुण्यात नायडू रुग्णालयामध्ये कोरोनासाठी स्वतंत्र कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. चीनमधून आलेल्या मुंबईतील दोघा संशयितांना तेथील कस्तुरबा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. चीनमधील वुहान शहरात कोरोना विषाणूचा उद्रेक घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर चीनच्या इतर शहरांतही या आजाराचे रुग्ण आढळले असून, जपान, थायलंड, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्येही रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईसह देशातील सात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर कसून तपासणी केली जात आहे. दि. २३ जानेवारीपर्यंत मुंबई विमानतळावर १७३९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मुंबई व पुण्यातील प्रत्येकी तीन प्रवाशांचा समावेश होता. मुंबईतील दोन प्रवाशांना सौम्य सर्दी व ताप असल्याने खबरदारी म्हणून त्यांना चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’मध्ये पाठविण्यात आले आहेत. कस्तुरबा रुग्णालयाप्रमाणेच पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये ‘कोरोना’ संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामध्ये सध्या चार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. संशयित रुग्ण आढळून आल्यास या कक्षामध्ये उपचार केले जातील. दरम्यान, जे प्रवासी कोरोनाबाधित देशातून भारतात येत आहेत, त्यांची माहिती दैनंदिन स्वरूपामध्ये विमानतळ अधिकाऱ्यांमार्फत राज्य आरोग्य विभागाला कळविली जात आहे. या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील २८ दिवस दररोज पाठपुरावाही केला जात आहे. काही लक्षणे आढळून आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याच्या सूचना त्यांना दिल्या जात आहेत. तसेच त्यांना विलगीकरण कक्षात भरती करण्याबाबतच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. ........................कोरोनाबाधित देशांतून मुंबईत आलेल्या एकूण सहा प्रवाशांपैकी दोघांना ताप होता. त्यामुळे दक्षता म्हणून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. संशयित रुग्णांवर उपचारासाठी मुंबईत कस्तुरबा व पुण्यात नायडू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष करण्यात आले आहेत. पण सध्या कस्तुरबा रुग्णालयावर अधिक भर दिला जाणार आहे. गरज भासल्यास नायडू रुग्णालयातही रुग्णांवर उपचार केले जातील. - डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग
पुण्यात नायडू रुग्णालयामध्ये ‘कोरोना’साठी नियंत्रण कक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 2:57 PM
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वप्रकारे दक्षता
ठळक मुद्देमुंबईत दोन संशयित : विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षतेच्या सूचना देशांतून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईसह देशातील सात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर कसून तपासणी जपान, थायलंड, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्येही रुग्णांची नोंद