पुणे : शहरातील वाहतुक कोंडीच्या समस्येमागे वाढती वाहन संख्या हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे प्राधान्याने या वाहनांच्या वापरावर निर्बंध आणल्याशिवाय कोंडी कमी होणार नाही. रस्ते तसेच खासगी जागेवरील पार्किंगवर बंधने आणणे, लक्ष्मी रस्त्यासह काही वर्दळीच्या रस्त्यांवर वाहनांना बंदी घालणे, गर्दीच्या ठिकाणी पार्किंगबाबत कडक नियमावली करणे यांसह वाहनांच्या नोंदणीवर काही मर्यादा आणता येतील का, यादृष्टीने विचार करावा लागेल. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करणेही गरजेचे आहे, असे मत वाहतुक तज्ज्ञांनी व्यक्त केले. मागील काही वर्षांपासून शहरातील वाढती वाहन संख्या डोकेदुखी ठरू लागली आहे. पुण्यात नोंदणी होणाऱ्या वाहनांप्रमाणे लगतच्या काही किलोमीटर अंतरावरील भागातून खासगी वाहनाने दररोज नोकरी किंवा विविध कामांनिमित्त येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नोंदणीकृत वाहनांच्या तुलनेत रस्त्यांवरील वाहनांची संख्या निश्चितच अधिक असते. रस्त्यांवरील ही कोंडी कमी करण्यासाठी वाहतुक तज्ज्ञांनी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वाहन वापरावर निर्बंध आणणे गरजेचे आहे. रस्त्यावरील वाहने कमी झाल्याशिवाय कोंडी फुटणार नाही, असे त्यांचे ठाम मत आहे. याविषयी बोलताना परिसर संस्थेचे रणजित गाडगीळ म्हणाले, सुबत्ता वाढली की वाहने वाढत जातात, हा जागतिक स्तरावरील अनुभव आहे. त्यानुसार पुण्यामध्ये वाहनांची वाढ होत आहे. त्याला लगेच कोणी रोखु शकणार नाही. त्यासाठी टप्याटप्याने प्रयत्न करावे लागतील. वाहन नोंदणीवर मर्यादा आणणे सध्यातरी शक्य नाही. पण या वाहनांच्या वापरावर विविध प्रकारे निर्बंध आणता येतील. सार्वजनिक पार्किंगचे दर वाढविणे, वेळेची मर्यादा घालणे, वाहन वाढीसाठीच्या धोरणांना मुरड घालणे, उड्डाणपुलासह रस्ता रुंदीकरणासारखे प्रोत्साहन देणारे प्रकल्प थांबविणे हे उपाय करता येऊ शकतात. केवळ सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करून वाहने कमी होणार नाहीत, हेही मान्य करायला हवे. ----------------तज्ज्ञांनी सुचविलेले उपाय : हर्षद अभ्यंकर (सेव्ह पुणे ट्राफिक मुव्हमेंट) :१. शहरात दर वर्षी किती वाहनांची नोंदणी करता येईल त्यावर मर्यादा आणणे२. निवासी, व्यावसायिक इमारतींनी जास्तीतजास्त किती पार्किंग पुरवावे, त्यावर मर्यादा आणणे३. अधिक रहदारीच्या वेळी खाजगी वाहने वापरायची असल्यास अधिभार/शुल्क वसूल करणे४. आपल्याकडे घरी तसेच कार्यालयात पार्किंग उपलब्ध असेल तरच वाहन विकत घेता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे...........प्रांजली देशपांडे ( वाहतुक नियोजनकार) :१. रस्त्यावर व अन्य ठिकाणी पार्किंग शुल्क आकारणे२. वाहनांसाठी सम-विषम धोरण राबविणे३. पर्यावरण पुरक क्षेत्र करून तिथे पादचारी, सायकल, ई-बस, ई रिक्षांना प्राधान्य देणे४. कार्यालयांच्या इमारतीमध्ये पार्किंग शुल्क जास्त ठेवणे, वाहन न वापरणाºया किंवा सायकल वापरणाºया कर्मचाºयांसाठी प्रोत्साहन योजना सुरू करणे५. लक्ष्मी रस्ता तसेच मोठ्या बाजारपेठा वाहनमुक्त करणेडॉ. प्रताप रावळ (प्रमुख, नियोजन विभाग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय) :१. जमिनीच्या वापरावर नियंत्रण हवे. २. कोणत्या भागात मॉल किंवा इतर मोठ्या आस्थापनांना मान्यता द्यायची, याचे धोरण तेथील वाहतुक व्यवस्थेचा विचार करून ठरवावे लागेल३. कमर्शियल ‘एफएसआय’वर मर्यादा असावी४. फुकट पार्किंग बंद करावे५. पार्किंग सुविधा जेवढी वाढेल, तेवढी रस्त्यावरील वाहने वाढतील. त्यामुळे रस्त्यांवरील पार्किंग कमी करायला हवे.
पुणे शहरातील वाहतूककोंडीवर रामबाण उपाय "वाहन वापरावर हवेत निर्बंध"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 6:00 AM
मागील काही वर्षांपासून शहरातील वाढती वाहन संख्या डोकेदुखी
ठळक मुद्देरस्त्यांवरील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी वाहतुक तज्ज्ञांनी सुचवल्या विविध उपाययोजना