पुणे : महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी ऊर्फ मनोहर भिडे यांच्यावर न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांनी सांगितले. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हेदेखील भिडे यांच्या टीकेने व्यथित झाले असल्याचे सप्तर्षी यांनी सांगितले.
सप्तर्षी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संभाजी भिडे शिवाजी महाराजांवर वार करणाऱ्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचे वंशज असल्याची टीका करून सप्तर्षी म्हणाले, भारतालाच नव्हे तर जगासाठी वंदनीय झालेल्या महात्मा गांधी यांची विचारसरणी संपवण्याचे कटकारस्थान सुरू आहे. भिडेंचे बोलणे त्याचाच एक भाग आहे. यामागे विशिष्ट विचारसरणी व त्या विचारसरणीना मानणारे विशिष्ट लोक आहेत. भाजप विरोधात देशपातळीवर ‘आयडिया ऑफ इंडिया’ उभी राहत असून त्यामुळे हादरलेले लोक देशात दंगे पेटवण्याची, वातावरण गढूळ करण्याची तयारी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यासंदर्भात थेट न्यायालयात दावा दाखल करणार आहे. त्यासाठीची कायदेशीर तयारी केली जात आहे. ती पूर्ण होताच भिडेंच्या विरोधात दावा दाखल केला जाईल, असे सप्तर्षी यांनी सांगितले.