पुणे महापालिकेतील चेन बुलडोझर पुरविण्याची वादग्रस्त निविदा अखेर रद्द ; 'सेटिंग' झाल्याचा काँग्रेसचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 07:35 AM2020-10-28T07:35:00+5:302020-10-28T10:39:52+5:30
चेन बुलडोझर मशिन पुरवण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर फेरनिविदा काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
पुणे : उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोवर ओपन डंपिंग बंद केल्यानंतरही येथील कॅपिंग आणि लॅन्डफिलचे काम करण्यासाठी चेन बुलडोझर मशिन पुरवण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर ही निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी हा गैरप्रकार उजेडात आणला होता.
कॅपिंग आणि लॅन्डफिलचे काम करण्यासाठी भाडेतत्वावर चेन बुलडोझर मशिन घेतली जाते. मागील चार वर्षापासून मशिन पुरवण्याचे काम मे. नॅशनल अर्थमूव्हर्स या ठेकेदारालाच दिले जात असून याच ठेकेदाराने कमी दराने निविदा भरल्याने त्यालाच काम देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला होता. चार वर्षांत इंधनापासून मजुरीचेही दर वाढले आहेत. अशा परिस्थितीत जुन्याच दराने काम करणे ठेकेेदाराला कसे परवडते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. काम न करताच पालिकेचे पैसे लाटायचे असा प्रकार असल्याचाही आरोप झाला होता.
ठेकेदाराची मशिनरी ३० वर्षे जुनी असून प्रशासनाने मशिनची तांत्रिक कार्यक्षमता तपासलेली नाही. तांत्रिक कार्यक्षमतेसाठी शासनाने १५ वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. असे असताना कालबाह्य मशिनच्या माध्यमातून काम करून घेतले. तसेच एका कारखान्याचा भंगारात काढलेल्या चेन बुलडोजरची पावती जोडण्यात आली होती.
कचरा डेपोवर ओपन डंपिंग बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात ओपन डम्पिंग सुरू आहे. दर कमी असल्याचे कारण देत अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू होता. या प्रकाराला काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी विरोध केला होता. हा प्रस्ताव रद्द करून संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.