पुणे : कालवा समितीच्या बैठकीत पुण्याच्या पाण्याबाबत काहीच निर्णय न झाल्याचे पडसाद मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. सभेच्या सुरुवातीलाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोरच्या मोकळ्या जागेत जमून आंदोलन केले व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला धक्का दिला. पाण्याच्या विषयावर चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. त्यावरून माजी महापौर प्रशांत जगताप व महापौर मुक्ता टिळक यांच्यात वाद झाला; मात्र विरोधकांची मागणी महापौरांना मान्य करावीच लागली.
‘पाणी पुण्याच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ म्हणत हातातील फ्लेक्स फडकावत सगळेच विरोधक मोकळ्या जागेत जमा झाला. महापौर टिळक यांनी त्यांना जागेवर बसण्याची विनंती केली. चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली. पाण्याच्या प्रश्नांवर बरेच बोलणे झाले आहे. आयुक्त खुलासा करतील, असे महापौर म्हणाल्या. माजी महापौर जगताप ‘तुमची हुकूमशाही चालणार नाही,’ असे म्हणाले. त्यावरून महापौर संतापल्या. काहीही आरोप करू नका असे त्या म्हणाल्या; मात्र चर्चेची मागणी त्यांना मान्य करावी लागली.पालकमंत्री बापट व पुण्याच्या पाण्याचे काय वाकडे आहे, समजत नाही, अशीच सुरुवात करत जगताप यांनी बापट यांनाच धारेवर धरले. त्यांच्यामुळे पुणेकरांना ऐन थंडीत घाम फुटला आहे, असे ते म्हणाले.
दिलीप बराटे सत्ताधाऱ्यांचा निषेध करतो, असे म्हणाले. प्रकाश कदम नाना भानगिरे संगीता ठोसर यांनी चर्चेत सहभाग घेतला. सुभाष जगताप म्हणाले, ‘‘ज्या लोकांना काही कळते असे समजले जाते, अशा लोकांनी महापौर निवासस्थानी बैठक सुरू असताना मोर्चा काढला. त्यामुळे तरी सत्ताधाºयांनी विषय गंभीरपणे घ्यायला हवा होता; पण तो घेतला नाही असेच दिसते आहे.’’महापौर टिळक व आयुक्त सौरभ राव यांनी मुंबईच्या बैठकीतील चर्चेची माहिती दिली. महापौर म्हणाल्या, ‘‘पुण्याला १,३५० एमएलडी पाणी मिळालेच पाहिजे, अशीच भूमिका सर्वांनी मांडली आहे. जलसंपदामंत्र्यांनी सर्वांचे म्हणणे एकूण घेतले. एक-दोन दिवसांत ते निर्णय देतील. बापट यांनी सर्वसमावेशक विचार करून मत व्यक्त केले आहे. त्यात पुण्यात पाणीकपात करू, असे म्हटलेले नाही.’’ राव यांनीही अशीच माहिती दिली.शिवसेनेचे संजय भोसले यांनी टीका सुरू करताच सुभाष जगताप व गोपाळ चिंतल यांनी त्यांना ‘जलसंपदा राज्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत,’ याची आठवण करून दिली. भोसले यांनी त्यावर ‘तुम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांना पुण्याचे पाणी कायम ठेवण्याची मागणी करा,’ असे आपण सांगत असल्याचा खुलासा केला. जगताप यांनी गिरीश महाजन व गिरीश बापट यांच्या वादात पुण्याच्या पाण्यावर कपात नको, असे सांगितले. त्यावर चिंतल यांनी त्यांना ‘दोन्ही गिरीश समजायला तुम्हाला वेळ लागेल,’ असे उत्तर दिले.दत्ता धनकवडे म्हणाले, ‘‘पुण्याचे हक्काचे पाणी पुण्याला मिळाले पाहिजे.’’ वसंत मोरे, विशाल तांबे यांनीही असेच मत व्यक्त केले. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी पुण्याचा पाणीप्रश्न सत्ताधाºयांमुळेच जटिल झाला असल्याची टीका केली. ते म्हणाले, ‘‘याआधीच्या पालकमंत्र्यांच्या कारकिर्दीत पुण्याच्या पाण्यावरून कधीच वाद झाला नाही.’’ भिमाले यांनी पुण्याचे पाणी कमी होणार नाही, अशी ग्वाही दिली. सध्या आहे तेवढे पाणी कायम मिळेल.