पुणे : महाविकास आघाडीत सारं काही ठीकठाक आहे आणि हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार अशी ग्वाही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेतेमंडळी देत असतात. मात्र, असं असलं तरीही महाविकास आघाडीतील तीन सहभागी पक्षात सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे उडणारे खटके देखील लपवून राहिलेले नाही. आधीच स्वबळाच्या नाऱ्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी पाहायला मिळत असतानाच आता माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते विजय शिवतारे यांनी पुरंदरच्या काँग्रेस आमदारावर गंभीर आरोप करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच पत्र लिहिलं आहे.
२०१९ च्या निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या विजय शिवतारे यांचा पराभव करत काँग्रेसचे संजय जगताप विजयी झाले होते. मात्र,आता महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र असताना येथील आजी - माजी आमदारात श्रेय वादावरून चांगलेच खटके उडाले आहे. आणि यावेळी शिवतारे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत काँग्रेसचे विद्यमान आमदारावर निशाणा साधला आहे. यात त्यांनी गंभीर आरोप देखील केले आहे.
विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, माझ्या मंत्रिपदाच्या कालावधीत पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या गुंजवणी धरणाचे काम मार्गी लावले. तसेच पुरंदर तालुक्यात आत्ता जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, या कामात अडथळे निर्माण करण्याचे काम स्थानिक आमदाराकडून होत आहे. अधिकाऱ्यांना धमकावत काम बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. स्थानिक आमदार संजय जगताप यांचा या कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावे असा त्यांचा आग्रह असल्याचे समजत आहे, असेही विजय शिवतारे यांनी पत्रात नमूद केले आहे.
शिवतारे यांनी पत्रात या सर्व कामांचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व्हावा अशी मागणी केली आहे. तसेच हा सर्व कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात झाला तरी हरकत नाही असेही त्यांनी पत्रात लिहिले आहे.
विजय शिवतारे कौटुंबिक वादानंतर चर्चेत.. पुरंदर तालुक्याचे माजी आमदार व शिवसेनेचे प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले विजय शिवतारे यांच्या कुटुंबातील वाद नुकताच चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे हृदयविकाराच्या झटक्यानंतर शिवतारे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना कौटुंबिक वादाने तोंड वर काढले आहे. शिवतारे यांची मुलगी ममता शिवदीप लांडे यांनी फेसबुकवरून पोस्ट लिहीत आपल्या आई आणि भावांवर आरोप केले आहे. तर ममता यांच्या आरोपाला शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पती विजय शिवतारे हे गेल्या २७ वर्षांपासून कुटुंबापासून अलिप्त असून पहिली पाच वर्ष एका महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहत आहेत” असा दावा देखील त्यांनी केला आहे.