बारामती (पुणे): भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरवातीलाच मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या ठरवावरून वाद झाला. कारखान्याचे माजी संचालक तानाजीराव थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. याच वेळी थोरात बोलत असताना शिवसेना पदाधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी पुढे जात या ठरावाला विरोध केला.
पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषणा देत अलीबाबा यांचे अभिनंदन करायचे नाही, अशा भाषेत शिंदे यांनी विरोध केला. त्यावर थोरात यांनी इतर नेत्यांचे अभिनंदन चालते, मग मुख्यमंत्र्यांचे का नाही अशी विचारणा केली. भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी संतप्त होत तुमची फौज का पळून गेली, याचा विचार करा अशी विचारणा केली. तसेच ही सभा बेकायदेशीर असल्याचा आरोपही केला.
अध्यक्ष प्रशांत काटे यांनी ही सभा बेकायदेशीर नसल्याचे सांगत तो अधिकार शासनाला असल्याचे सांगितले. तर सतीश काटे यांनी प्रत्येकाने घरी अभिनंदन करावे, इथं 'एफआरपी' मिळाली नाही त्याचा विचार करा अशी सूचना मांडली.