पुणे : शहरात २०१९ मधील मोठ्या पावसामुळे दुतर्फा भरून वाहून, पात्राबाहेर उसळलेल्या पाण्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या आंबिल ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यास गुरुवारी सुरुवात झाली. पण, केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत स्थानिकांनी कारवाईला विरोध केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.नागरिकांच्या विरोधामुळे पोलिसांच्या सुरक्षेत कारवाई सुरू झाली. परिणामी, दांडेकर पुलाजवळच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले. न्यायालयाने गुरुवारी या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिल्याने महापालिकेला दुपारनंतर थांबावे लागले.
गुुरुवारी सकाळी सात वाजल्यापासूनच दांडेकर पूल परिसरातील आंबिल ओढ्याच्या पात्रातील अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे बुलढोझर, कर्मचारी, ट्रक असा ताफा दाखल झाला. या कारवाईला विरोध होणार हे गृहीत धरून महापालिकेने मोठा पोलीस बंदोबस्त येथे ठेवला होता. कारवाईस सुरुवात झाल्यावर स्थानिकांनी याला तीव्र विरोध केला. काही जणांनी आता बेघर होणार म्हणून अंगावर रॉकेल ओतून स्वत:स पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे येथील वातावरण तापले.
महापालिकेने मात्र ही कारवाई योग्य असून वारंवार सूचना देऊनही नागरिक येथील अतिक्रमण काढण्यास तयार नसल्याचे सांगत पोलीस बंदोबस्तात कारवाई चालू ठेवली. या कारवाईविरोधात स्थानिक रहिवासी हनुमंत फडके हे न्यायालयात गेले. न्यायालयाने या कारवाईला तात्पुरती स्थगिती देत महापालिकेने या कारवाई विषयी आपली भूमिका प्रथम न्यायालयात सादर करावी. हे म्हणणे सादर करेपर्यंत ही कारवाई थांबवण्याची सूचनाही केली.
५२ कुटुंबे झाली आहेत स्थलांतरित
न्यायालयाच्या या निर्णयामुळे दांडेकर पूल परिसरातील आंबिल ओढ्यातील कारवाई दुपारी दोनच्या सुमारास महापालिकेकडून थांबवली गेली. मात्र, तोपर्यंत अतिक्रमणातील १३६ घरांपैकी काही घरे पूर्णत: पाडण्यात आली होती. तर जागा खाली करण्याबाबतची नोटीस मिळाल्याने आदल्या रात्रीच ५२ कुटुंबे येथून स्थलांतरित झाली होती, तर काही जणांनी कारवाई सुरू केल्यावर गुरुवारी सकाळी आपली घरे रिकामी केल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे़