- किरण शिंदेपुणे: गणपती मिरवणुकी दरम्यान गणपती मंडळ लाईनला लावण्यावरून झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला. तीन अल्पवयीन मुलांनी या तरुणाला सत्तुरने आणि दगडाने मारहाण करत ठार मारले. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव परिसरातील चरवड वस्ती या ठिकाणी मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. श्रीपत अनंत बनकर (वय १८, निवृत्ती नगर, वडगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणपती मंडळ लाईनला लावण्यावरून मयत आणि आरोपी यांच्यात वाद झाले होते. तेव्हाचा राग अजूनही आरोपींच्या मनात होता. दरम्यान 3 डिसेंबरच्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मयत श्रीपत बनकर हा मित्रासोबत दुचाकीने जात होता. त्याचवेळी अल्पवयीन आरोपीही पायी चरवड वस्ती येथून जात होते. यावेळी आरोपींनी आवाज देऊन श्रीपत बनकर याला थांबवले. तसेच आमच्याकडे खुन्नस्ने का बघतो असे म्हणून त्याच्यासोबत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारी झाले. त्यानंतर आरोपींनी श्रीपत बनकर याच्यावर दगडाने आणि सत्तुरने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने श्रीपत बनकर याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खून प्रकरणात सहभागी असणाऱ्या तीनही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) ,3(5) सह भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणपती मिरवणुकीतील वाद जीवावर बेतला; सत्तुरने वार करत एकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 11:26 IST