पुणे: 'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली होती. या गाण्यामुळे गायक उमेश गवळी, संगीतकार प्रणिकेत खुळे आणि निर्मात्या संध्या केशे हे त्रिकूट महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून 'कॉपीराईट’च्या मुद्यावरून त्रिकूटामध्ये वादाची ठिणगी पडली अन् हा वाद इतका विकोपाला गेला की थेट हे गाणे यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या एकत्रित प्रयत्नामुळे महामंडळाच्या लवादासमोर मिटला.
प्रणिकेत खुणे, संध्या केशे आणि उमेश गवळी यांच्यात गाण्याच्या कॉपीराईटवरून वाद झाला होता. हे गाणे यूट़्यबवरून काढून टाकल्यामुळे या तिघांचेही मोठे आर्थिक नुकसान होत होते. यामुळे संध्या केशे आणि प्रणिकेत खुणे यांनी या वादाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांकडे धाव घेतली होती. मनसेचे रमेश परदेशी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या माध्यमातून महामंडळाच्या लवादासमोर हा वाद चर्चेने सोडविण्यात आला.
उमेश गवळी म्हणाले, मागील काही दिवसांपासून आमच्या तिघांमध्ये संवाद नव्हता. त्यामुळे आमच्यात गैरसमज निर्माण होऊन परस्परांविषयी चूकीची वक्तव्ये केली गेली. त्यामुळे मराठी रसिकांमध्ये चुकीचा मेसेज गेला. आता आम्ही तिघांनी एकत्र येऊन मनसे चित्रपट सेना, चित्रपट महामंडळांच्या प्रयत्नांतून हा वाद मिटवला आहे. आता आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. यापुढेही आम्ही एकत्रित काम करून मराठी रसिकांची सेवा करणार आहोत.
छेड काढल्यानंतर पोलिसांना फोन करणाऱ्या तरुणीचा मोबाईल पळवला
वादाच्या पार्श्वभूमीवर संध्या केशे, प्रणिकेत खुणे आणि उमेश गवळी विविधमाध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आले होते. या मराठी कलाकारांचे नुकसान होऊ नये, यांच्यात फूट पडू नये, म्हणून मनसेने चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि मनसेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांच्या माध्यमातून चित्रपट महामंडळाच्या लवादासमोर हा वाद मिटवला आहे. मराठी कलाकारांनी एकमेकांचे पाय न ओढता, यापुढे एकत्र राहून अधिक चांगले काम करावे. या कलाकारांना सर्व मदत करण्याची मनसेची भूमिका राहील असे मनसेचे पुणे उपशहराध्यक्ष जयराम लांडगे यांनी सांगितले.