पुणे : पादचारी सुरक्षा आणि सुविधा धोरणानुसार जंगली महाराज रस्त्यावरील पदपथ वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे़ त्यामुळे दोन झाडांच्या मध्ये यापूर्वी करण्यात येणाऱ्या पार्किंगवर संक्रांत येणार आहे़ त्याचा परिणाम या रस्त्यावरील वाहतूककोंडीत वाढ होण्याची शक्यता आहे़ जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन रोड २१ आॅगस्ट २००९ रोजी एकेरी करण्यात आला़ या वेळी हे रस्ते आदर्श करण्यासाठी महापालिका, पदपथ विभाग, वाहतूक शाखा यांची एकत्रित बैठक ५ आॅक्टोबर २००९ रोजी वाहतूक शाखेचे तत्कालीन उपायुक्त मनोज पाटील यांच्या कार्यालयात झाली होती़ त्यात पदपथ ३ मीटर असावा, तो एक सलग व लगतच्या रोडच्या पदपथाला समांतर असावा़ पदपथाच्या कडेने सलग रेलिंग लावावे़ फक्त बसस्टॉप, पार्किंग व खासगी जागेत हे रेलिंग खुले करावे़ डाव्या बाजूला बससाठी ३़५ मीटर लेन असावी़ सायकल ट्रॅक २़५ मीटर असावा़ तो उजव्या बाजूला लोकांच्या सूचना लक्षात घेऊन करावा़ पादचारी रस्ता ओलांडण्यासाठी २५० मीटरवर व जेथे नैसर्गिक क्रॉसिंग आहे तेथेच ठेवावे़ हलक्या वाहनांसाठी ३ मीटरचा रस्ता ठेवावा़ पार्किंग प्लॅन तयार करावा, अशा विविध बाबी ठरविण्यात आल्या होत्या़ एक आदर्श रस्ता तयार करण्याचा निर्णय या वेळी एकत्रितपणे घेण्यात आला होता़ यानंतर महापालिकेने मात्र त्यानुसार काहीही केले नाही़ नागरिक कोठूनही रस्ता ओलांडणार नाही़ यासाठी पदपथाच्या कडेने सलग रेलिंग लावणे आवश्यक होते़ पण ते साधे काम महापालिकेने केले नाही़ की सायकल ट्रॅकही तयार केला नाही़ जंगली महाराज रस्ता एकेरी केल्याने मधले दुभाजक काढले, पण हा रस्ता एकसलग होण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे अजूनही या रस्त्याच्या मध्ये उंचवटा दिसून येतो़ २००९ मध्ये झालेल्या निर्णयापैकी एकही गोष्ट न केल्याने या रस्त्यावरील वाहतूक कायमच विस्कळीत राहिली़ आता महापालिकेने पादचारी सुरक्षा आणि सुविधा धोरण तयार केल्यानंतर जंगली महाराज रस्त्यावरील पदपथ वाढविले जात आहेत. राणी लक्ष्मीबाई चौक ते डेक्कन जिमखाना या रस्त्याच्या कडेला अनेक मोठी झाडे आहेत़ या झाडांना चौथरा बांधून दोन झाडांच्यामध्ये पार्किंगची सोय करण्यात आली आहे़ नव्या धोरणानुसार जंगली महाराज रस्त्यावरील दोन्ही बाजूचे पदपथ वाढविले जात आहेत. ते या रस्त्यांवरील झाडांच्या चौथऱ्यापर्यंत असणार आहेत़ त्यामुळे रस्त्याच्या उजवीकडे असलेली सध्याची पार्किंगची जागा त्यात जाणार आहे़ या रस्त्यावर अनेक व्यावसायिक इमारती व मोठ्या संख्येने हॉटेल्स आहेत़ त्यांचे स्वत:चे पार्किंग जवळपास नसल्यात जमा आहे़ असले तरी त्यावर अतिक्रमण झाले आहे़ त्यामुळे या इमारतीत व हॉटेलमध्ये येणारे ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने पार्क करतात़ नव्या धोरणानुसार हे पार्किंग जाणार असल्याचे दिसून येते़ संभाजी उद्यानातही पार्किंगची जागा अपुरी आहे़ पादचाऱ्यांची सोय पाहताना वाहनांच्या पार्किंगवर मुळावर ही नवी नीती येणार नाही, याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे़ (प्रतिनिधी)कोंडी वाढणारसंभाजी उद्यानाशेजारी महापालिकेने मोटारींसाठी बहुमजली मॅकनाईज पार्किंग तयार केले आहे़ पण, त्याचा वापर होत नसल्याने तो पांढरा हत्ती ठरला आहे़ साहजिकच लोक रोडवर पार्किंग करणाऱ लक्ष्मी रोडवर ज्या पद्धतीने मोटारचालक आतमध्ये बसून गाड्या रस्त्यावरच उभ्या करतात, तशीच परिस्थिती जंगली महाराज रस्त्यावर होण्याची शक्यता आहे़ वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने व शिवाजीनगर, कर्वेनगर भागाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने यापुढेही या मार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ होणार आहे़
वाढीव पदपथामुळे पार्किंगवर संक्रांत
By admin | Published: March 30, 2017 3:00 AM