पुणे : पुणे शहरासह दौंड, इंदापूरला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला धरणसाखळीतील एकूण पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य नसल्याचे जलसंपदाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळेच शिल्लक पाणी आता फक्त पिण्यासाठीच वापरण्याचा निर्णय जलसंपदाच्या खडकवासला विभागाने घेतला असल्याचे समजते. पुणे शहराला २८ फेब्रुवारीपर्यंत लागणारे पाणी लक्षात घेता उर्वरित शिल्लक पाणीसाठ्यातून दौंड, इंदापूरसह सुमारे ३५ ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाणी पुरविण्यात येणार आहे.उन्हाळी आवर्तनाचा निर्णय २८ फेब्रुवारीअखेरपर्यंत धरणात किती साठा शिल्लक राहतो त्यावर घेण्यात येतो. पुण्याला लागणारे पाणी बाजूला ठेवले तर फक्त अडीच टीएमसी पाणी धरणात शिल्लक राहते. पुण्याच्या पाण्यात दर गुरुवारी कपात केल्यानंतरचा हा हिशेब आहे. या अडीच टीएमसी पाण्यात शेतीसाठी आवर्तन सोडणे अशक्य असल्याचे अधिकाºयांचे मत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती मिळाली. पाण्याचे सगळे नियोजन आता पिण्यासाठी लागणारे पाणी लक्षात घेऊनच करण्यात येत आहे. त्यामुळेच शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तनावर संक्रांत आली आहे.पुणे शहराला ११.५० टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. याचा अर्थ, त्यांनी दररोज फक्त ८९२ दशलक्ष लिटर पाणी धरणातून घ्यायचे आहे. प्रत्यक्षात मात्र पालिका रोज १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे. इतके पाणी मिळूनही संपूर्ण शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा करताना पालिकेची दमछाक होत आहे. मात्र, आता पाणीसाठाच शिल्लक नसल्यामुळे पुणे शहरावरही पाणीकपात करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. तसे थेट जाहीर न करता दर गुरुवारी पाणीपुुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्या दिवशी १,३५० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे. आठवड्यातून एकदा १,३५० म्हणजे महिनाभरात ५ हजार ४०० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे.खडकवासला धरणासाखळीत (खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर) मागील वर्षी याच काळात २०.१२ टीएमसी पाणी होते. यंदा फक्त १५.१२ टीएमसी आहे. त्यामुळेच जलसंपदाचे पाण्याचे नियोजन बिघडले आहे. पाणीसाठा कमी झाल्यामुळेच गेला महिनाभर जलसंपदाकडून पुणे शहराला पाणीकपात करण्याचा आग्रह धरण्यात येत होता. यासाठी ३ वेळा पंप बंदही करण्यात आला.
शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनावर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 3:25 AM