पुणे : समरस असलेला समाजच संघटित होऊ शकतो. अस्पृश्यता, भेदाभेद असलेला समाज संघटित होऊ शकणार नाही. समरसता केवळ भाषणापुरती नव्हे तर जीवनात आचरण करण्याची गोष्ट आहे. देशात आजही भय, लोभाद्वारे धर्मांतरण सुरू असून ही गंभीर समस्या असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले.
रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्यावतीने (महाराष्ट्र प्रांत) देण्यात येणाऱ्या २६ व्या श्री गोळवलकर गुरुजी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्यासह पुरस्कारार्थी हिंदू मुन्नाणी संघटनेचे के. सुब्रह्मण्यम आणि वास्तुशिल्पकार चंद्रकांत सोमपुरा यांचे पुत्र निखिल सोमपुरा उपस्थित होते. यावेळी सोमपुरा यांना कला क्षेत्रासाठी साताळकर यांच्या हस्ते तर के. सुब्रह्मण्यम यांना हिरेमठ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी हिरेमठ म्हणाले, पवित्रता, उदात्तता आणि विशालता ही मंदिरांची वैशिष्ट्ये आहेत. मंदिरांमधून घडणारा हा संस्कार आहे. आपल्या पूर्वजांच्या श्रेष्ठ संस्कृती, जीवनमूल्य आणि संस्कारातून राष्ट्र व समाजाची निर्मिती झालेली आहे. यापुढे समाजाला जागरूक, संघटित व्हावे लागेल. जातीपाती, धर्म प्रांत या भेदामुळे परकीय आक्रमणे सुरू झाली. अफगाणिस्तान गेले, नेपाळ, तिबेट, श्रीलंका, म्यानमार हे सर्व देश वेगळे झाले. पाकिस्तान आणि बांग्लादेशची फाळणी झाली. भारताची सीमा ८३ लाख वर्ग किलोमीटरवरून ३३ लाख वर्ग किलोमीटरवर आल्याचे हिरेमठ म्हणाले.
यावेळी ‘सेवा सर्वोपरी’ या जनकल्याण समितीच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यवाह तुकाराम नाईक यांनी त्याची माहिती दिली. डॉ. साताळकर यांनी प्रास्ताविक केले. तर, अरुण डंके यांनी आभार मानले.
====
‘भारत एक खोज’ करताना मनातील हिंदुत्व जागे झाले. परदेशात न जाता आपल्या संस्कृती आणि कलेचे जतन करण्याचा निर्णय घेतला. कर्जतच्या स्टुडिओमध्ये अशा अनेक कलाकृती निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. लोक ताजमहालकडे जागतिक आश्चर्य म्हणून पाहतात. परंतु, जेव्हा अयोध्येमध्ये राममंदिर उभे राहिल तेव्हा भारतीयच नव्हे तर जगभरातील लोक अभिमानाने त्याच्याबद्दल सांगतील.
- नितीन चंद्रकांत देसाई