लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४० व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उद्या मंगळवारी खेत्रपाल मैदानावर पार पडणार आहे. नाैदल प्रमुख अॅडमिरल करंबीरसिंग लांबा विद्यार्थ्यांची मानवंदना स्वीकारणार आहेत. जवळपास ३०० कॅडेसट्ची तुकडी सशस्त्र दलात समाविष्ट होणार आहे. कोरोनामुळे मोजक्याच मान्यवरांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनामुळे संरक्षण संस्थांमधील कार्यक्रांवर मर्यादा आली आहे. एनडीएच्या दीक्षांत संचलन सोहळाही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पहाटे ६ च्या सुमारास संचलन सोहळ्यास सुरुवात होईल. वर्षातून दोन तुकड्या एनडीएतून त्यांचे ३ वर्षांचे खडतर प्रशिक्षण करून सशस्त्र दलात दाखल होतात. मे आणि डिसेंबर महिन्यात या दोन तुकड्या सैन्य दलात समाविष्ट होत असतात. कोरोनामुळे माध्यमांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. या कार्यक्रामे थेट प्रक्षेपण डीडी वाहिनीवर करण्यात येणार आहे.