पुणे : स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडाचा वापर करु नये यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या धूरमुक्त व चूल मुक्त अभियानांतर्गत जिल्ह्यात केरोसीन वापरकर्त्यांना उज्ज्वला योजने अंतर्गत स्वयंपाक गॅसचे वितरण करण्यात येणार आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत ७३ हजार ८९९ व्यक्तींना या योजने अंतर्गत गॅसजोड देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाला दिले आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाची सुरुवात उपायुक्त (पुरवठा) निलीमा धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात केली. जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अमिता तळेकर व प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या जिल्हा नोडल अधिकारी अनघा गद्रे या वेळी उपस्थित होत्या. येत्या १५ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अभियानात पात्र कुटुंबांना शंभरटक्के शिधापत्रिका वाटप करणे व सर्व कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. उज्ज्वला योजने अंतर्गत जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ६४९ गॅस जोड दिले आहेत. तर, जिल्ह्यामध्ये ७३ हजार ८९९ लाभार्थ्यांना २५२ किलो लिटर (२ लाख ५२ हजार लिटर) केरोसीन वाटप करण्यात येते. या केरोसीन धारकांना गॅस जोड देणार आहे. महिनाभरामधे हे उद्दीष्ट पूर्ण करण्याची सूचना अधिकारी, कर्मचारी व पुणे जिल्ह्यातील गॅस वितरकांना केली.
पुणे जिल्हा करणार धूर मुक्त : केरोसीन वापरणाऱ्यांना देणार स्वयंपाक गॅस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 10:54 AM
येत्या १५ ऑगस्टपर्यंत ७३ हजार ८९९ व्यक्तींना या योजने अंतर्गत गॅसजोड देण्याचे उद्दिष्ट आहे.
ठळक मुद्दे७३ हजार गॅस सिलिंडरचे करणार वाटपउज्ज्वला योजने अंतर्गत जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ६४९ गॅस जोड दिले