पुणे : सर्व शिक्षण अभियान जवळ जवळ गेली दोन शतके शिक्षणक्षेत्रात अग्रेसर असलेल्या सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एका अत्यंत नावीन्यपूर्ण समाजोपयोगी प्रकल्पाची योजना आखली आहे. त्याअंतर्गत रेल्वे स्थानकातील कुलींना प्राथमिक इंग्रजी संभाषणकलेचे धडे देण्यात येणार आहेत.स्टेशनमास्टर डी. बी. पाटील यांनी या कार्यक्रमाला सहमती दर्शविली आहे. त्यांच्या हस्तेच या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या (दि. २१ आॅक्टोबर) सकाळी ११ वाजता प्लॅटफॉर्म नंबर १ वर होणार आहे. सूर्यदत्ताचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया या वेळी उपस्थित राहणार आहेत.रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या व पुणे रेल्वे हमाल मजदूर संघटनांच्या सहकायार्ने हा कार्यक्रम नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत राबविला जाणार आहे. १० हमालांचा एक गट करून त्यांना एकूण ३० तासांचे इंग्रजी संभाषण कलेचे मार्गदर्शन करण्यात येईल. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १०० कुलींना प्रशिक्षित केले जाईल. यामुळे कुली या वंचित समाजघटकाचा आत्मविश्वास तर वाढेलच; पण रेल्वे प्रवासी व कुली यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होईल. या प्रकल्पासाठी सूर्यदत्ताच्या शिक्षकांनी खास अभ्यासक्रम तयार केला आहे. पुण्यामध्ये परदेशांतून व परप्रांतांतून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रा. एन. सी. सेठिया, नितू गुप्ता, रागिणी ठक्कर, शहनाज, मृणाल कोठारी व सूर्यदत्ताचे व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी कुलींना इंग्लिश शिकवतील.(प्रतिनिधी)
कुली म्हणणार, ‘मे आय हेल्प यू?’
By admin | Published: October 21, 2014 5:27 AM