दौंड : दौंड शहरातील स्वच्छतागृहाच्या लाभार्थींना मिळालेल्या पैशाचा उपयोग स्वच्छतागृह बांधण्यासाठीच करावा की जेणेकरून दौंड शहर हगणदारीमुक्त होईल, असे आवाहन ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी केले. दौंड नगर परिषद कार्यालयात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छतागृहासाठी निधीच्या धनादेश वाटपप्रसंगी ते बोलत होते. कटारिया म्हणाले, ‘‘शहरातील एकूण १५१ लाभार्थींना वैयक्तिक १७ हजार रुपये स्वच्छतागृह बांधण्यासाठी मंजूर झाले आहेत. पैकी १२ हजार रुपये शासनाचे व ५ हजार रुपये नगर परिषदेचे आहेत. लाभार्थी व्यक्तींनी आपले बँकेत खाते उघडावे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. जसे जसे स्वच्छतागृहाचे काम प्रगतीवर राहील त्यानुसार उर्वरित निधीची रक्कम दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. तेव्हा लाभार्थी नागरिक स्वच्छतागृह बांधतात की नाही, याबाबत नगर परिषद देखरेख करणार आहे.’’ नगरसेवक राजू बारवकर म्हणाले, ‘‘दौंड शहर स्वच्छतागृहाच्या माध्यमातून हगणदारीमुक्त करायचे आहे. त्यानंतर आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून सरकारी जागेवर गरिबांना घरकुल योजना राबविण्याचा मनोदय आहे.’’ दरम्यान, गेल्या चार वर्षांपूर्वी दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाताना जी काही आश्वासने जनतेला दिली ती जवळजवळ पूर्ण केलेली आहेत. काही कामे प्रगतिपथावर आहेत. नगर परिषदेतील गटनेते बादशाह शेख म्हणाले, ‘‘स्वच्छतागृहाची योजना चांगली आहे. याचा फायदा जनतेने घेतला पाहिजे. कारण आरोग्यासाठी स्वच्छतागृह महत्त्वाचे आहे. याकामी सत्ताधाऱ्यांना मी सहकार्य करेल.’’ या वेळी राजेश मंथने यांनी विचार मांडले. याप्रसंगी नगराध्यक्षा अंकुशा शिंदे, आरोग्य विभागाच्या सभापती कार्तिकी सोनवणे, मुख्याधिकारी शिवाजी कापरे, बबन सरनोबत, मीरा वीर, आकांक्षा काळे, संगीता बनसोडे, शीतल मोरे उपस्थित होते.
दौंड शहराच्या हगणदरीमुक्तीसाठी सहकार्य करा
By admin | Published: December 22, 2015 1:16 AM