पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता नसल्याने राज्यातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. इतर राज्यात प्रवेशाच्या पहिल्या दोन फेऱ्यांतून सीईटीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो, तर शेवटची फेरी ही सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. राज्य शासन व राज्य सीईटी सेलनेसुद्धा याच प्रकारे प्रवेशप्रक्रिया राबवावी, अशी मागणी विनाअनुदानित शिक्षण संस्थाचालकांकडून केली जात आहे.
‘असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन एडेड इन रुरल एरिया’ या संस्थाचालक संघटनेची राज्यस्तरीय बैठक अध्यक्ष रामदास झोळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्यास राज्यातील विनानुदानित शिक्षण संस्थांचे ७८ प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी शासनाकडे करण्याबाबत चर्चा झाली.
व्यावसायिक अभ्यासक्रमास सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. परिणामी काही कारणांस्तव सीईटी न देऊ शकलेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. त्यामुळे पहिल्या दोन फेऱ्यांतून सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यानंतर अंतिम फेरी सीईटी न दिलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी. तसेच बारावीनंतरच्या सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या अंतिम गुणवत्ता याद्या तयार झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेतील पसंती क्रमांक अर्ज भरणे, जागावाटप, महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे, प्रवेश प्रक्रियेतील फेऱ्यांची संख्या आणि प्रवेश प्रक्रियेतील सर्व टप्पे एकाच वेळी घेण्यात यावेत. त्यामध्ये समुपदेशन फेरीचा समावेश असावा. तसेच सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशाची अंतिम तारीख एकच असावी, अशीही मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.
--
प्रवेश पूर्व परीक्षा बारावीच्या निकालापूर्वी घेतल्या जातात. मात्र, काही वेळा विद्यार्थ्याला निकालानंतर प्रवेश परीक्षा दिलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश न घेता इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची इच्छा होते. परंतु, त्याची प्रवेश परीक्षा वेगळी असल्याने तो विद्यार्थी इच्छित प्रवेशापासून वंचित राहतो. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेशप्रक्रियेत बदल करून विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर कराव्यात.
- रामदास झोळ, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन एडेड इन रुरल एरिया